गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा

0
13

अमरावती,दु.06 : बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यावरून मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसची मंगळवारी रात्री ८.१५ वाजता बडनेरा रेल्वेस्थानकावर तपासणी करण्यात आली. अमरावतीच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकांसह बडनेरा रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी अर्ध्या तासात रेल्वेच्या २६ डब्यांची तपासणी केली. मात्र बॉम्ब सापडला नाही. तपासणीदरम्यान प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गीतांजली एक्स्प्रेसमधील एका डब्यात बॉम्ब असल्याच्या माहितीचा संदेश मुंबईच्या वाडीबंदर व नागपूर लोहमार्ग रेल्वे नियंत्रण कक्षाकडून बडनेरा रेल्वे स्थानकाला मिळाला होता. माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने त्वरित अ‍ॅक्शन घेत रेल्वे तपासणीसंदर्भात सर्व तयारी करून ठेवली होती. अमरावतीवरून ताबडतोब बॉम्ब शोधक व नाशक पथक बोलाविण्यात आले होते. बडनेरा रेल्वे स्थानकावर सायंकाळी ४.२० वाजताच्या नियमित येणारी ही गाडी मंगळवारी रात्री ८.१५ वाजता पोहोचली. मुंबईवरून निघालेली या गाडीची कल्याण, नाशिक, जळगावनंतर अकोला स्थानकावर तपासणी करण्यात आल्यामुळे ती बडनेरा रेल्वेस्थानकावर उशिरा पोहोचल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. बडनेरा रेल्वेस्थानकावर बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, दिलीप शेळकेंसह अन्य पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक सीएच पटेल, एपीआय पी.व्ही.चके्र , विजय गिरी, विजय मसराम, राजू गाडवे, विजय रेवेकर, सुरेंद्र गोहाड, राहुल हिरोडे, सुनीता चौधरी यांनी प्रत्येक डब्याची तपासणी केली.