सामाजिक न्यायमंत्रीसह सचिवाच्या मुलाचे नाव परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या यादीत

0
35

गोंदिया/मुंबई,दि.06:राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने  ४ सप्टेंबर, २०१७ रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णय क्रमांक : ईबीसी २०१७/ प्र.क्र. ४०६/शिक्षण-१ नुसार  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागाने  काढली त्यांतर्गत 2017-18 या वर्षासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.सदर योजना 2003 पासून सुरु असून त्यामध्ये सातत्याने बदल करण्यात आले आहेत.त्यातच 27 जून 2017 रोजी सुध्दा काढलेल्या निर्णयानुसार योजनाची सुधारित नियमावली करण्यात आल्याचे म्हटले आहे.या योजनेंतर्गत 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन त्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. या परदेशी शिष्यवृत्ती सन २०१७ साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री,राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव व उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकार्याच्या मुलांना लाभ मिळाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री राजकुमार बडोले यांची कन्या ‘श्रुती राजकुमार बडोले’ ३ वर्षांसाठीच्या ऍस्ट्रॉनॉमी डॉक्टरेट अभ्यासासाठी मँचेस्टर युनिव्हर्सिटी येथे निवड झाल्याचे यादीत 34 व्या क्रमांकावर नाव आहे.तर 35 व्या क्रमांकावर स्वप्निल सुधाकर इंगळे याची ट्रिनीटी काॅलेज डब्लीन येथे निवड झाली आहे. तसेच, सामाजिक न्याय विभागाचे सचिव वाघमारे यांचा मुलगा  ‘अंतरिक्ष दिनेश वाघमारे’ अमेरिका येथे २ वर्षाचा मास्टर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.त्याचा 21 व्या क्रमांकावर नाव यादीत आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर मंत्री व सचिवावर स्वतःच्या पाल्याःना तसेच गर्भश्रिमंत अधिकारी व व्यवसायीकांच्या पाल्यांना पाठविण्यासाठि शासन निर्णय बदलल्याचे बोलले जात आहे.उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी दयानंद मेश्राम यांचा मुलगा समिर दयानंद मेश्राम याचेही 11 व्या क्रमांकावर यादीत आले आहे.सोबतच आज 6 सप्टेबंरला एक शासन निर्णय काढून  प्रशांत भिमराज कांबळे याची निवड करण्यात आल्याचेही म्हटले आहे.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी परदेशी पाठविण्याच्या निमित्ताने मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मुलांना परदेशी पाठवून सामान्य विद्यार्थ्यांना डावलणाऱ्या या सरकारी भूमिकेचा सर्वत्र विरोध होत आहे.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठीचे  निकष :

  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे आणि तो नोकरी करत असल्यास सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थ्यांना राज्य किंवा केंद्र सरकारची शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.
  • लाभार्थीचे वय कमाल 35 वर्षे आणि पीएचडीसाठी 40 वर्षे असावे.
  • पदव्युत्तर परीक्षेत किमान 55 टक्के गुण आवश्यक.
  • शिष्यवृत्तीनंतर लाभार्थी देशाची सेवा करेल, या अनुषंगाने हमीपत्र लिहून द्यावे.

साहेब निवड समितीवर नव्हते,मुलगी हुश्शार-ना.बडोलेंचे स्वीह सहाय्यक

या सर्व प्रकरणाबाबत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संपर्क करुन वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांचे दोन्ही भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही. मात्र त्यांचे गोंदिया येथील स्वीय सहाय्यक प्रकाश रहागंडाले यांना याप्रकरणाबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी सदर विद्यार्थ्यांच्या निवड समितीवर मंत्रीमहोदय नव्हते.तर मंत्रीमहोदयांची सर्वच मुले हुश्शार असून श्रृत्ती सुध्दा हुश्शार आहे,तीला निवडीसाठी अशाप्रकारची गरजेची आवश्यकता नसल्याचे सांगितले.