साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा मान हिवरा आश्रमाला

0
11

नागपूर, दि. 10 – बहुप्रतिक्षित 91 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा विदर्भात होणार आहे.  हिवरा आश्रमाला या वर्षीचा यजमानपदाचा मान  मिळाला आहे. त्यामुळे विदर्भाच्या प्रवेशद्वारावर सारस्वतांचा मेळा भरणार आहे. यजमानपदाबाबत एकमत नसल्याने आज मतदान झाले यामध्ये 5 विरुद्ध 1 मताने हिवरा आश्रमवर शिक्का मोर्तब करण्यात आले. ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळाची अधिकृत घोषणा रविवारी नागपुरात झाली. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भाला जोडणारा सेतू म्हणून ज्याची ओळख आहे त्या बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रमला या संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. महामंडळाच्या नागपुरातील कार्यालयात रविवारी एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात संमेलनस्थळ पाहणी समितीने आपला अहवाल सादर केला. दिल्लीतील आयोजक संस्थेने ऐनवेळी माघार घेतल्याने बडोदा व हिवरा आश्रम हे दोनच पर्याय महामंडळापुढे उरले होते. परंतु, यातील एकाही स्थळावर एकमत होत नसल्याने अखेर मतदान घेण्यात आले. या मतदानात एक विरुद्ध पाच अशा फरकाने हिवरा आश्रमला पसंती मिळाली.