स्वदेशी बनावटीचे पाणबुडीभेदी जहाज नौदलात दाखल

0
33

विशाखापट्टणम,दि.16(वृत्तसंस्था)- भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज (सोमवार) “आयएनएस किल्तान’ या स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीभेदी लढाऊ जहाजाचा औपचारिकरित्या भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. यावेळी नौदलप्रमुख सुनील लांबा, नौदलाच्या पूर्व मुख्यालयाचे (ईस्टर्न कमांड) मुख्याधिकारी एच एस बिश्‍त आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

“प्रोजेक्‍ट 28′ या नौदलाच्या प्रकल्पांतर्गत बांधणी करण्यात आलेल्या कार्मोता प्रकारातील (क्‍लास) चार लढाऊ जहाजांपैकी “आयएनएस किल्तान’ हे तिसरे लढाऊ जहाज आहे. या जहाजावर स्वदेशी बनावटीचे शस्त्रास्त्रे बसविण्यात आली असून; हवाई व “सोनार’ सर्वेक्षण प्रणालींचाही या जहाजावर अंतर्भाव करण्यात आला आहे. लक्षद्वीप आणि मिनिकॉय या बेटसमूहांमध्ये वसलेल्या व व्यूहात्मकदृष्टया महत्त्वपूर्ण असलेल्या आमिनिदिवी बेटांमधील एका बेटावरुन या जहाजाचे नाव ठेवण्यात आले आहे.

“आयएनएस किल्तानमुळे भारताची संरक्षण व्यवस्था अधिक सुदृढ झाली आहे. याशिवाय, या लढाऊ जहाजाची बांधणी पूर्णत: भारतात करण्यात आली आहे. यामुळे या जहाजाचा नौदलातील समावेश हा “मेक इन इंडिया’ या योजनेमधील यशाचाही क्षण आहे,” असे सीतारामन म्हणाल्या.