मुख्यमंत्र्यांशी संवादानंतर बच्चू कडूंचे आंदोलन मागे

0
32

अमरावती,दि.16 : प्रहारचे सर्वेसर्वा आ. बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणीनंतर तब्बल चार दिवसांनी सोमवारी मागे घेतले. त्याकरिता पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यशस्वी शिष्टाई केली.स्थानिक गाडगेनगरातील संत गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील प्रांगणात दिव्यांग, अनाथ, विधवा, परितक्त्या, शेतकरी, शेतमजूर व बेघरांच्या न्याय्य हक्कासाठी प्रहार संघटनेच्यावतीने १३ आॅक्टोबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. आ.बच्चू कडू हे स्वत: आंदोलनात सहभागी होते.

आंदोलनस्थळी मुलांबाळांसह पालाच्या झोपडीत राहुट्या टाकून आंदोलनात नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आ. कडूंच्या मागण्यांसंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत जिल्हास्तरीय प्रश्न, समस्या मार्गी लावल्याचे आ.कडू यांना प्रशासनाने कळविले. मात्र, राज्यपातळीवर समस्या, प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आ.कडू यांनी घेतली. सोमवारपासून मौनव्रत आंदोलनास प्रारंभ होईल, असे पत्रपरिषदेत जाहीर केले. किंबहुना रविवारी रात्री १० वाजतादरम्यान आ. कडू यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने इर्विनच्या अतीदक्षता कक्षात  भरती करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी नैना कडूसुद्धा होत्या. त्यानंतर पालकमंत्री पोटे यांनी इर्विनचे शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आ.कडू यांच्या प्रकृतीबाबत काळजी घेण्याची सूचना केली.

कालांतराने ना.पोटे हे आ.बच्चू कडू यांची भेट घेण्यास ईर्विनमध्ये पोहचले. दरम्यान ना.पोेटेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आ.बच्चू कडू यांच्या राज्यस्तरीय मागण्यांबाबत २४, २५ आॅक्टोबर अथवा त्यांच्या सोईनुसार मुंबईत बैठक घेऊन प्रश्न, समस्या सोडविल्या जातील, असे  पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे पत्र आ. कडूंना देण्यात आले. एवढेच नव्हे, तर पालकमंत्र्यांनी भ्रमणध्वनीद्वारे मुख्यमंत्र्यांशी आ.कडू यांचा संवाद करून दिला. आ.कडू हे मुख्यमंत्र्यासोबत बोलले आणि त्यांनी दिलेला शब्द अधोरेखित मानून सोमवारी मध्यरात्री अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.