सहा नक्षलसमर्थक व दोन नक्षल्यांना अटक,एकाचे आत्मसमर्पण

0
30

गडचिरोली, दि.१८: जिल्हा पोलिसांनी विविध विघातक कारवायांमध्ये सहभाग असलेल्या २ जहाल नक्षल्यांसह ६ नक्षलसमर्थकाना नुकतीच अटक केली, एका नक्षल्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.६ नक्षलसमर्थक व २ नक्षल्यांना अटक केल्याने तसेच एका नक्षल्याने आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असून, हे गडचिरोली पोलिसांचे मोठे यश आहे, असेही पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

रैनू काना पुंगाटी(३५)रा.गोंगवाडा,ता.भामरागड व जयलाल उर्फ पुसू मट्टामी(२७) ता.एटापल्ली अशी अटक केलेल्या नक्षल्यांची, तर कोरके नेहा पल्लो(६०),अशोक फकिरा सोमनकर(५५), झुरु चिन्ना पुंगाटी(६०), संतोष नारायण(३५), बंडू चिन्ना गेडाम(४५), जोगे जोगी मज्जी(६५) सर्व रा. धोडराज अशी नक्षल समर्थकांची नावे आहेत. या सहा नक्षलसमर्थकांना १४ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. मेडपल्ली येथे झालेल्या भुसुरुंगस्फोटात त्यांचा सहभाग होता, असे पोलिसांनी म्हटले आहे. रैनू काना पुंगाटी हा नक्षलवादी १० वर्षांपासून नक्षल दलममध्ये कार्यरत होता. दलममध्ये असताना तो १२ बोअर बंदूक वापरत होता. विविध भूसुरुंगस्फोट व अन्य गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याला १६ ऑक्टोबरला अटक करण्यात आली. जयलाल मट्टामी हा नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक ४ चा सदस्य होता. त्याला ११ ऑक्टोबरला अटक करण्यात आली.

सतीश उर्फ कोसा आडमे सोडी,जि.सुकमा(छत्तीसगड) हा कंपनी क्रमांक १० चा सदस्य होता. त्याने कोठी पोलिस मदत केंद्रात आत्मसमर्पण केले. अल्पवयीन असताना नक्षल्यांनी जबरदस्तीने आपणास दलममध्ये भरती केले, अशी माहिती सतीशने दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.