भीषण अपघातात दरीत कोसळली बस

0
5

रायपूर,दि.27(वृत्तसंस्था) – छत्तीसगडच्या बिलासपूरपासून 50 किमी अंतरावरील बंजारी घाटात एक बस अपघात झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 36 जण जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी पेंड्रा आणि गौरेला येथे दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये कोंबून-कोंबून प्रवासी भरले होते. ड्रायव्हर आणि क्लीनर दारू प्यायलेले होते. ज्या वेळी अपघात झाला त्या वेळी ड्रायव्हर दारूच्या नशेत होता. अपघातातील जखमींपैकी 2 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये एक महिलाही सामील आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्यांनी रुग्णालयात हलवले.
अलाहाबादहून बस ओडिशासाठी रवाना झाली होती. यात बहुतांश प्रवासी ओडिशाचेच एकाच कुटुंबातील होते, ते आपल्या नातेवाइकांच्या अस्थी विसर्जनासाठी अलाहाबादला आले होते. याशिवाय काही प्रवासी जांजगीर, तखतपूर, मुंगेली, रागड आणि बिलासपूरच्या बसमध्ये स्वार होते. बस बंजारी घाटात पोहोचताच नशेत तर्रर झालेल्या ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटून दरीत कोसळली. अपघाताच्या वेळी बहुतांश प्रवासी झोपेत होते, यामुळे काही वेळासाठी कुणालाच काय झाले ते कळले नाही.आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 36 जण जखमी आहेत. जखमींना सिम्स, पेंउ्रा, व गौरेला येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

पहाटे 3 वाजता ड्रायव्हरने बस एका ढाब्यावर थांबवली होती. येथे सर्वांनी जेवणे केली. यादरम्यान ड्रायव्हर काही लोकांना म्हणालाही की पहाटे 5.30 वाजता बिलासपूरला पोहोचवून देईन. परंतु त्या आधीच हा अपघात झाला. दुर्घटनेनंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनीच 108 रुग्णवाहिकेला फोन करून माहिती दिली.