वजन जास्त झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

0
8

नाशिक,दि.09(वृत्तसंस्था) – लातूरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे आज (शनिवार) सकाळी नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक दौरा संपवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अन्य तिघेजण औरंगाबादकडे जात असताना ही घटना घडली. नाशिकमधून हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेताच हेलिकॉप्टरमध्ये वजन जास्त झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुन्हा हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. अखेर त्यांचा खानसाम सतीश काणेकरला उतरवल्यानंतर हेलीकॉप्टरने पुन्हा टेकऑफ केले. हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन आणि स्वीय सचिव औरंगाबादला रवाना झाले.

याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री औरंगाबादला पोहचल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही लातूर येथे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातातून ते थोडक्यात बचावले होते. हेलिकॉप्टरच्या बाबतीत वारंवार अशा घडत असताना सुरक्षेच्या बाबतीत इतक्या त्रुटी का ठेवल्या जातात, यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण
हेलिकॉप्टरमध्ये सहा जणांची क्षमता होती. पण इंधनाच्या समस्येमुले फक्त चार प्रवाशांना परवानगी होती. टेक ऑफवेळी सुरक्षेच्या कारणास्तव फक्त तीन प्रवाशांना नेणं सुरक्षेचं ठरेल असा निष्कर्ष काढण्यात आला, त्यामुळे त्यांनी तशी विनंती केली. यानंतर एका व्यक्तीला उतरवण्यात आलं आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर टेक ऑफ झालं. ही रुटीन प्रॅक्टीस असून, इतका गंभीर मुद्दा नाहीये.