राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांना स्वाईन फ्लूची लागण

0
11

जयपूर: जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाईन फ्लूची धास्ती भारतातही आहे. महाराष्ट्रातील नागपूरमध्येही गेल्या काही दिवसांत अनेकांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. आता राजस्थानमध्येही स्वाईन फ्लूने पाय पसरले आहेत. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.

स्वाईन फ्लूची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं खुद्द गेहलोत यांनीच सांगितलं. गेहलोत यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

“मलाही स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. मात्र मी वेळीच उपचार घेतल्याने सध्या प्रकृती सुधारत आहे”, असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.स्वाईन फ्लू रोखण्यासाठी राजस्थान सरकारकडून काहीही प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे. राजस्थानमधील मोठ्या शहरांत स्वाईन फ्लूची ही स्थिती असेल, तर अन्य खेड्यांमध्ये काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकार याबाबत गंभीर नाही. काँग्रेस सरकारच्या काळात पहिला रुग्ण आढळला, तेव्हाच आम्ही मोफत आरोग्य तपासणी सुरू केली होती,’ असंही गेहलोत यांनी म्हटलं आहे.

राजस्थानातील 22 जिल्ह्यांत सध्या स्वाईन फ्लूने धुमाकूळ घातला आहे. जयपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे.