वेळेवर उपचार न मिळाल्याने मळसूर आरोग्य केंद्रात चार महिन्याच्या बालकाचा मृत्यू

0
7

अकोला,दि.19ः-वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज १९ डिसेंबर रोजी सकाळी घडली. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोग्य सेवेबद्दल संताप व्यक्त केला. दरम्यान, तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.
वेदांत सुमीत कंकाळ (वय ४ महिने) नामक बालकाला मंगळवारी सकाळी त्याच्या आई – वडिलांनी साडेआठ वाजताच्या सुमारास मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले; मात्र त्यावेळी या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाºया बागवान आणि पी.डी. मोरे या दोन्ही वैद्यकीय अधिकाºयांपैकी एकही उपस्थित नव्हता. एवढेच नव्हे तर तेथे कार्यरत नियमित आरोग्य सेवक किंवा आरोग्य सेविका यांच्यापैकीही कोणीच हजर नव्हते. केवळ तेथील शिपाई उपस्थित होता. त्यामुळे नजीकच असणाºया आयुर्वेदिक दवाखान्यातील महिला डॉक्टर सुनयना यांना पाचारण करण्यात आले; मात्र त्यादेखील उशीराने पोहोचल्या. त्या पोहोचेपर्यंत बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. संबंधित महिला डॉक्टरने बालकाची तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. शासनाद्वारे ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरविण्यासाठी मोठा गवगवा करुन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या १०८ क्रमांकाच्या गाडीसाठीही बालकाच्या पालकांनी फोन केला; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.