आमदार निवास दुरुस्तीच्या नावावर कोट्यवधींचा गैरव्यवहार; चरण वाघमारे

0
13

नागपूर दि.२२:: मुंबईतील मनोरा या आमदार निवासातील आमदारांच्या खोल्या सुसज्जित करण्यासाठी खरेदीच्या नावावर कोट्यवधीचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी केला. हा सर्व प्रकार अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाला असल्याने अधिकाऱ्यांवर मोका लावून गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही त्यांनी केली.आमदार  वाघमारे यांनी सभागृहात सांगितले की, आमदार निवासात ३३० वर्गफुटाची खोली आहे. मुंबईतील दराप्रमाणे एक खोली सुसज्ज करण्यासाठी १५०० रुपये वर्ग फुटाच्या दराप्रमाणे पाच लाख रुपयापर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. परंतु आमदार निवासातील एका खोलीवर तब्बल २८ लाख रुपयाचा खर्च झालेला आहे.
आ.वाघमारे यांनी शुक्रवारी विधानसभेत ‘पॉर्इंट आॅफ इन्फॉरमेशन’अंतर्गत हा मुद्दा उपस्थित केला. वाघमारे म्हणाले, माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून आपण या प्रकरणाच्या खोलापर्यंत पोहोचलो. दुकानांमधून कोरे इस्टीमेट तयार करून अधिकाऱ्यांनी अपल्या मनमर्जीने त्यात रक्कम भरली. एक लाखपेक्षा अधिकच्या खरेदीसाठी टेंडर काढणे आवश्यक असताना अभियंत्यांनी आमदार निवासासाठी थेट खरेदी केली. हा मोठा गैरव्यवहार आहे. अशा वेळी या प्रकरणात मोकाअंतर्गत कारवाई व्हावी. सरकार ते करीत नसेल तर मला तक्रार करण्याची परवानगी द्यावी. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनीही हा मुद्दा उपस्थित केला
अधीक्षक अभियंत्याकडून चौकशी करण्याचे आदेश
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अधीक्षक अभियंत्यामार्फत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता दुसऱ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या अधीक्षक अभियंत्याकडून ही चौकशी केली जाईल.