ओवेसींची नागपूरचीही सभा उधळवून लावू, सेनेचा इशारा

0
8

नागपूर (03 फेब्रुवारी): पुण्यापाठोपाठ आता नागपूरमध्येही शिवसेनेनं एमआयआएमविरोधात मोर्चेबांधणी सुरू केलीये. एमआयएमचे प्रमुख असाउद्दीन ओवेसी यांची 28 फेब्रुवारीला नागपुरात सभा आयोजित करण्यात आली आहे. जर ओवेसींच्या सभेला परवानगी दिली तर त्यांना नागपुरात पाय ठेवू देणार नाही, सभा उधळवून लावू असा इशारा शिवसेनेनं दिलाय.

पुण्यात मुस्लिम आरक्षण परिषदेसाठी एमएमआयएमचे नेते असाउद्दीन ओवेसी यांची सभा होणार होती. मात्र शिवसेनेचे नेते विनायक निम्हण यांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला. कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेत वानवाडी पोलिसांनी ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारली. पुण्यात परवानगी नाकारल्यानंतर नागपूरमध्येही ओवेसींची सभा होणार असल्याचं कळताच शिवसेनेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलीये. ओवेसींच्या सभेला परवानगी देऊ नये जर दिली तर ओवेसींना नागपुरात पाय ठेवू देणार नाही असा इशाराच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतिश हरडे यांनी दिलाय.याबाबत पोलीस आयुक्तांना भेटून ओवेसींच्या सभेला परवानगी देऊ नका अशी विनंती करणार असल्याचं हरडे यांनी सांगितलं. तसंच ओवेसींच्या सभेला परवानगी जर दिली तर सभा उधळवून लावू असा इशाराही त्यांनी दिला. तर शिवसेनेची ही गुंडगिरी आहे अशी प्रतिक्रिया एमआयएमचे जिल्हा सेक्रेटरी सुजा रहेमान यांनी दिली.