कुलभूषण जाधव यांची कुटुंबीयांशी भेट

0
10

इस्लामाबाद,दि.25(वृत्तसंस्था):पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने आज जाधव यांची भेट घेतली. तब्बल दीड वर्षानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जाधव यांची भेट घेतली असून त्यांना या भेटीसाठी केवळ अर्धा तासच देण्यात आला होता.

कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईने इस्लामाबाद विमानतळावर आज दुपारी १२.३० वाजता उतरल्या. त्यानंतर त्यांना परराष्ट्र मंत्रालयात नेण्यात आलं. गाडीतून उतरताच त्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि परराष्ट्र मंत्रालायतील भारतीय उच्चायुक्तांच्या भेटीला रवाना झाल्या. या भेटीत उच्चायुक्तांनी त्यांना ब्रिफ केल्याचं पाकिस्तानी मीडियाचं म्हणणं आहे. यावेळी त्यांच्यासोबत पाकिस्तानातील भारताचे उपउच्चायुक्त जे. पी. सिंहही उपस्थित होते. त्यानंतर जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची परराष्ट्र मंत्रालयात भेट झाली. यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जाधव यांच्या आई आणि पत्नीने जाधव यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. मात्र या भेटीतील चर्चेचा तपशील मिळू शकला नाही. सायंकाळी ४ वाजता जाधव यांच्या आई आणि पत्नी भारताकडे रवाना होणार आहेत.

ज्या मार्गावर परराष्ट्र मंत्रालयाचे कार्यालय स्थित आहे तेथे सर्वसामान्य नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर मीडिया कर्मचा-यांचीही प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. जाधव कुटुंबीय पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालय परिसरात दाखल झाल्यानंतर त्यांनी मीडियाला अभिवादनदेखील केले, मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकर दिला. जाधव कुटुंबीय दुबईमार्गे इस्लामाबाद येथे दाखल झाले. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध करणार असल्याचे पाकिस्ताननं सांगितले होते. याव्यतिरिक्त जर भारतानं परवानगी दिली तर त्यांच्या कुटुंबीयांना मीडियासोबत बातचित करण्याचीही परवानगी देण्यात येईल.  दरम्यान, यानंतर जाधव यांचे कुटुंबीय मीडियासोबत बातचित करणार नसल्याचे पाकिस्तानी अधिका-यांनी सांगितले.