कमला मिल आग प्रकरण: अधिकारी-मालकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार – मुख्यमंत्री

0
8

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.29 – कमला मिल आवारातील आग दुर्घटना प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या आणि प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या मुंबई महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांनी बेकायदेशीररित्या परवानग्या दिल्याचे स्पष्ट झाल्यास अधिकाऱ्यांवर तसेच संबंधित मालक-चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड परिसरातील मोजो आणि वन अबव्ह या उपाहारगृहांना (पब-रेस्टो) गुरुवारी मध्यरात्री आग लागून त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करून 15 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. आज दुपारी मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या पाच अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. मात्र, घटनेतील मृत्यूप्रकरणी अधिकारी किंवा संबंधित मालक जबाबदार असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी व इतर गुन्हे दाखल करण्यात येतील. दोषींवर निश्चित कारवाई केली जाणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अशा पद्धतीने परवानग्या देण्यात आलेल्या इमारतींचे तात्काळ सुरक्षा ऑडिट करण्यासह विनापरवानगी करण्यात आलेली व सुरू असलेली बांधकामे युद्धपातळीवर तोडण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

चौकट :–
@ कमला मील अग्नितांडवांची आयुक्तांमार्फत चौकशी अमान्य, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करावी, मुंबई शहर भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीच्या तोंडावर असून,आणखी किती मुंबईकरांना आपले प्राण देऊन भ्रष्टाचाराची किंमत मोजावी लागणार ? – विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील

@ मुंबईच्या कमला मील परिसरातील हॉटेलला आग लागुन झालेल्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, महानगरपालिका आणि राज्य सरकार मधील भ्रष्ट अधिकार्‍यांच्या कारभारामुळेच अशा घटना वारंवार होत आहेत – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

@ गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात विविध दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा – खा. अशोक चव्हाण

@ लोअर परेल येथील कमला मिल कम्पाऊंड आवारातील अग्नीतांडवाला हॉटेल मालक, जमिन मालक आणि प्रशासन जबाबदार असून या सर्वांवर कठोर कारवाई करावी – भाजपा आ. प्रसाद लाड

@ कमला मिलमध्ये लागलेल्या भीषण आगीची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करावी, पबमालकासह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त मदत द्यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर