नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख रामन्नास पत्नीसह बल्लारपुरातून अटक

0
10

गडचिरोली,दि.९(अशोक दुर्गम): नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख व ज्येष्ठ सदस्य रामन्ना यास त्याच्या पत्नीसह आज गडचिरोली पोलिसांनी बल्लारपुरातून अटक केली. एका ज्येष्ठ नक्षल्यास सपत्नीक अटक होणे, हे पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या कार्यकाळातील सर्वांत मोठे यश आहे.रामन्ना व त्याची पत्नी पद्मा हे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर परिसरात असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळताच त्यांनी ही माहिती चंद्रपूर पोलिसांना दिली. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी सापळा रचून बल्लारपूर येथून रामन्ना व त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले. नंतर दोघांनाही गडचिरोली पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. रामन्नाचे मूळ नाव श्रीनिवास विठ्ठलअण्णा मडरु(६५) असे असून, तो सिंकदराबाद येथील रहिवासी आहे. त्याच्या पत्नीचे नाव पद्मा उर्फ समाक्का उर्फ मयुरी उर्फ लता उर्फ मिनती डोबय्या कोडापे(५५) असे असून, ती अहेरी तालुक्यातील मांड्रा येथील रहिवासी आहे.

रामन्ना या नावाने परिचित असलेला श्रीनिवास मडरु हा १९७६-७७ पासून नक्षल चळवळीत कार्यरत आहे. नक्षल्यांनी त्यावेळी रामन्नाकडे जनसंघटनाचे काम सोपविले होते. पुढे १९९५ पासून त्याच्याकडे तांत्रिक विभागाचे काम देण्यात आले व नंतर तो या विभागाचा प्रमुख झाला. दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य म्हणूनही तो कार्यरत होता. मार्च १९९६ मध्ये पोलिस व नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत त्याचा सहभाग होता. त्यावेळी तो तांडा दलममध्ये कार्यरत होता. यानंतर तो कोंडागाव दलम, माड दलम, टिपागड, अहेरी, बस्तर जंगल परिसरातील दलममध्येदेखील कार्यरत राहिला. नक्षल्यांसाठी रायफली बनवून त्या चालविण्याचे प्रशिक्षण देणे ही महत्त्वाची कामे रामन्ना करीत होता. शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

रामन्नाची पत्नी पद्मा कोडापे ही १९९२ मध्ये टिपागड दलममध्ये असताना धानोरा तालुक्यातील चकमक, २२ मार्च १९९६ रोजी बालाघाट परिसरातील डेरिमुरम येथील चकमक, २२ एप्रिल १९९६ मध्ये त्याच परिसरातील सिंदेगाव येथील चकमक, १९९८-९९ मध्ये बस्तर परिसरातील सिरिवेरा येथील चकमक इत्यादी चकमकींमध्ये तिचा सहभाग होता. तिच्यावर शासनाने ६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांच्या चौकशीतून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.एका ज्येष्ठ नक्षल्यास सपत्नीक अटक होण्याची घटना ही पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या कार्यकाळातील मोठे यश मानले जात आहे.