साहित्य संमेलन व भाषा विशेषांक दर्जेदार – मारुती चितमपल्ली

0
28

लोकराज्यच्या विशेषांकाचे पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर,दि.09 : लोकराज्यचा साहित्य संमेलन व मराठी भाषा विशेषांक अत्यंत दर्जेदार असून या अंकाच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेसोबतच मराठी भाषेच्या विकासासंदर्भातील अभ्यासपूर्ण माहिती वाचक व अभ्यासकांना उपलब्ध होत आहे. लोकराज्य विशेषांकाच्या माध्यमातून मराठी वाचकांपर्यंत संमेलनाचा इतिहास उपलब्ध होत असल्याचे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व सुप्रसिद्ध ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी आज काढले.
फेब्रुवारी महिन्याच्या लोकराज्य साहित्य संमेलन, मराठी भाषा व व्यवसाय मार्गदर्शन विशेषांकाचे लोकार्पण सुप्रसिद्ध ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी विशेषांकाबद्दल अभिप्राय व्यक्त करताना ते बोलत होते.यावेळी विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, निवृत्त माहिती संचालक शरद चौधरी, सांस्कृतिक समितीचे आंमत्रक उदय पाटणकर, कार्यालय सचिव नितीन सहस्त्रबुद्धे, व्यवस्थापक प्रदीप मोहिते, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सहाय्यक संचालक जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते.
मराठी साहित्य संमेलनाची परंपरा, यापूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष, मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनासाठी राबविण्यात असलेले उपक्रम तसेच 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा शारदा देवीची यात्रा आदी लेख अत्यंत वाचनीय असून अभ्यासकांनाही लोकराज्यचा विशेषांक संग्रहणीय असल्याचे ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी यावेळी सांगितले.विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांनी साहित्य संमेलन, मराठी भाषा हा लोकराज्यचा विशेषांक अत्यंत वाचनीय तसेच उत्कृष्ट मांडणीमुळे सुबक व नेटका झाला आहे. सुरेश भट यांची मायबोली ही कविता मराठी रसिकांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल माहिती विभागाचे विशेष आभार व्यक्त केले. या अंकासोबत मराठी तरुणांसाठी व्यवसाय मार्गदर्शन यांतर्गतचे लेख युवकांना निश्चितच प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी स्वागत करुन माहिती व जनसंपर्क विभागातर्फे माहे फेब्रुवारी महिन्याचा लोकराज्य विशेषांक हा साहित्य संमेलन, मराठी भाषा व व्यवसाय मार्गदर्शन या विषयाला वाहिलेला आहे. या अंकाचे अतिथी संपादक म्हणून मराठी भाषा आणि शालेय, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे हे असून अंकात विविध साहित्य संमेलन व त्यांचे अध्यक्ष तसेच मराठी आणि करिअर संधी, सांस्कृतिक वारसाचे जतन आणि संवर्धन त्यासोबतच व्यवसाय मार्गदर्शनांतर्गत करिअरच्या संधी आदी माहिती या अंकाद्वारे अभ्यासक व वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
लोकराज्य मासिकाचा साहित्य संमेलन, मराठी भाषा व व्यवसाय मार्गदर्शन विशेषांक सर्व बुक स्टॉलवर उपलब्ध असून जिल्हा माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन, तिसरा माळा, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे उपलब्ध आहे.