सातव्या अ.भा.मराठी संत साहित्य संमेलनाचे सूप वाजले

0
14

गोंदिया,दि.17 :  अर्जुनी/मोरगाव येथील संत चोखोबा नगरीत वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त वतीने आयोजित ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आज १७ फेब्रुवारी शनिवार रोजी ५ ठराव पारीत करून काल्याच्या किर्तनाने सूप वाजले.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष ह.भ.प. डॉ.रामकृष्ण महाराज लहवीतकर, स्वागताध्यक्ष पालकमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास राज्यमंत्री अमरिश राजे आत्राम, आमदार संजय पुराम, आमदार विनायक मेटे, आमदार कृष्णा गजबे,शिवसंग्रामचे उदय टेकाडे,   जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे,  बाबा महाराज राशनकर, माधव महाराज शिवनीकर, प्रशांत महाराज ठाकरे, महादेवबुवा शहाबाजकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या संतसाहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी खुले अधिवेशन घेवून पाच ठराव पारीत करण्यात आले. त्यात संत चोखोबा निर्वाणस्थळ विकसित करण्यासाठी शासकीय जागा मंगळवेढा येथे उपलब्ध करून देणे, संत चोखोबा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन, वारकरी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात प्रत्यक्ष सहभागी झाल्याबद्दल ना. राजकुमार बडोले व राज्य शासनाचे अभिनंदन, राज्य शासनाकडून समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणा-या सामाजिक दुरूस्तीच्या योजनेच्या अंलबजावणीसाठी विचारमंथन असणा-या व कोणताही मतभेद अथवा दुजाभाव न करणा-या वारकरी साहित्य परिषदेला समाजाच्या मानसिक दुरूस्तीसाठी प्रकल्प योजना करताना व अंमलबजावणी करताना सहभागी करून घ्यावे, ह.भ.प. वैकुंठवासी अजरेकर फकप्रमुख अजरेकर माऊली उर्फ ह.भ.प.तुकाराम एकनाथ काळे महाराज यांचे माघ एकादशीदिवशी वैकुंठ झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचे ठराव पारित करण्यात आले. या ठरावांचे सुचक विठ्ठल पाटील, नरहरीबुवा चौधरी, बापुसाहेब महाराज देहूकर, भाऊसाहेब महाराज पाटील हे होते. तर ठरावांचे अनुमोदन हभप चैतन्य महाराज कबीरबुवा, माधव महाराज शिवणीकर, सुर्यकांत चौरे, बाबा महाराज राशनकर, रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी केले.