शेतकरी ठाकुर यांचे कडुन पंतप्रधानांनी जैविक शेतीची माहिती जाणून घेतली

0
11
जैविक कृषी उन्नती मेळाव्यात शेती स्टॉलला प्रतिसाद
गोंदिया,दि.18 : राजधानी दिल्लीत १६ मार्चपासून आयोजित तीन दिवसीय जैविक कृषी उन्नती मेळाव्यात विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या मेळाव्यात गोंदिया येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र ठाकुर यांनी जैविक यौगिक शास्वत शेती कशा पद्धतीने करावी यावर स्टॉल लावले आहे. त्या स्टॉलला  (दि.१७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शेतकरी ठाकुर यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली.
विशेष म्हणजे, शेतकरी ठाकुर यांनी गोंदिया जिल्ह्यात सुरू केलेला हा प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला आहे. त्यांच्या या प्रयोगाने जिल्ह्यातील अनेक शेतकरी जैविक शेतीकडे वळले आहेत. त्यातच फलोत्पादन, भाजीपाला अशा विविध प्रकारचे उत्पादन जिल्ह्यात घेतले जात आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत होणार्‍या राज्यस्तरीय, विभागीयस्तरीय तसेच जिल्हास्तरीय कृषी महोत्सवातही या पद्धतीचे स्टॉल शेतकरी ठाकुर लावित असतात व त्या माध्यमातून अनेक शेतकर्‍यांना मार्गदर्शनही करतात. दिल्ली येथील कृषी मेळाव्यात त्यांच्याकडून स्टॉल लावण्यात आला आहे.  हा प्रोजेक्ट ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या कृषी व ग्रामविकास प्रभागाच्यावतीने तयार करण्यात आले असून, रासायनिक खतापासून कसे दुष्परिणाम होतात, हे या स्टॉलमधील प्रयोगातून गोंदियाचे प्रगतशील शेतकरी व ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी महेंद्र ठाकुर हे भेट देणार्‍यांना समजावून सांगत आहेत.
जिल्ह्यातील शेतकर्‍याने राष्ट्रीयस्तरावर कृषी प्रदर्शनीत सहभाग घेवून त्या प्रदर्शनीत लावलेल्या कृषी स्टॉलची दखल थेट पंतप्रधानांनी घेवून व त्यांच्याकडून माहिती जाणून घेतल्याने जैविक शेती पद्धतीला चालना मिळेल, अशी आशा वर्तविण्यात येत असून या शेतकर्‍याचे अभिनंदनही करण्यात येत आहे.