पेट्रोल व डिझेल महागले

0
4

नवी दिल्ली, दि. १५ – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने रविवारी भारतातील पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होणार आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे ८२ पैसे व डिझेलच्या दरात प्रति लीटर ६१ पैशांची वाढ झाली असून आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत सातत्त्याने घटत असल्याने भारतातील पेट्रोल व डिझेलचे दर खालावले होते. पण फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात कच्च्या तेलाला अच्छे दिन आले असून त्याच्या दरात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र या दरवाढीचा फटका आता भारतीयांनाही बसणार आहे. रविवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली जाणार आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतात पेट्रोल व डिझेलचे दर वाढवण्यात आले होते.त्यानंतर पेट्रोलच्या दरात तब्बल १० वेळा आणि ऑक्टोंबर २०१४ पासून डिझेलच्या दरात सहा वेळा कपात करण्यात आल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत होता. मात्र आता या दरात वाढ झाल्याने महागाईदेखील वाढू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.