सार्वजनिक बांधकाम विभागात २३ हजार कोटींचा घोटाळा

0
13

रत्नागिरी,दि.01(विशेष प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागात सुमारे २३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा राज्यात सुमारे ९ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामात झाल्याचा आरोप आमदार उदय सामंत यांचे बंधू व प्रसिद्ध बांधकाम ठेकेदार किरण सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
हा महाराष्ट्र संपवण्याचा डाव असून, मी तांत्रिक मुद्द्यावर कोणत्याही अभियंत्याशी बोलण्यास तयार असल्याचे सांगत सामंत यांनी या भ्रष्टाचारप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाला आव्हान दिले. ते पुढे म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात मुंबईत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत काही आमदारांनी संबंधित विषय मांडला होता. मात्र, बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी या दराने का प्रक्रिया राबवली, हे त्यांनाच माहिती असे सामंत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ही निविदा प्रक्रिया सचिव जोशी यांच्या सूचनेप्रमाणे राबवली जात आहे. प्रति किलोमीटर रस्त्याचे १ कोटी रुपये दराने अंदाजपत्रक बनविणे शक्य असताना ते प्रति किलोमीटर अडीच कोटी रुपये दराने बनविण्यात आले आहे, असे किरण सामंत म्हणाले. राज्यात सुमारे ९ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम १० हजार कोटी रुपंयामध्ये होणे अपेक्षित आहे. मात्र, याच कामासाठी सावजनिक बांधकाम खाते सुमारे २३ हजार कोटी रुपये खर्च करीत असल्याचे सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील ११९ कि़लोमीटर लांबीच्या रस्त्यांचाही या कामामध्ये समावेश असल्याचे किरण सामंत यांनी यावेळी सांगितले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांच्यावर थेट आरोप करताना त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही ठेकेदार किरण सामंत यांनी केली आहे.