हिंदू राष्ट्राचे स्वरुप कसे असेल?-मोहम्मद सालीस

0
12

कानपूर (उत्तर प्रदेश) – भारताच्या हिंदू राष्ट्रातील परिवर्तनानंतर हिंदू राष्ट्राचे स्वरुप कसे असेल यासह अन्य सहा सवाल सुन्नी उलेमा कौन्सिलचे सचिव हजी मोहम्मद सालीस यांच्या नेतृत्वाखालील समितीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंद्रेश कुमार यांना विचारला आहे.

संघाचे सरसंघचालक के.एस.सुदर्शन यांच्या कल्पनेतून 2002 साली साकारलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे कुमार मार्गदर्शक आहेत. मात्र सुन्नी उलेमा कौन्सिलचे सचिव हजी मोहम्मद सालीस यांच्या नेतृत्वाखालील समितीने विचारलेल्या सहा प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे टाळत असल्याचा आरोप सालीस यांनी केला आहे. तसेच त्यासाठी मुस्लिम परिषदेने स्वतंत्रपणाने संमेलन घेऊन निमंत्रित करण्याची मागणी करत असल्याचेही सालीस यांनी म्हटले आहे. “आमची इंद्रेशजी यांच्यासमवेत सोमवारी रात्री बैठक झाली आहे. त्यामध्ये आम्ही त्यांना सहा प्रश्‍न विचारले आहेत. पण त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताला हिंदू राष्ट्र समजतो का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताला हिंदूराष्ट्रात परिवर्तन करण्यासाठीचे काही स्वरुप निश्‍चित केले आहे का? हे हिंदू राष्ट्र हिंदू धर्मग्रंथानुसार आहे की संघाने नवे तत्वज्ञान तयार केले आहे? धर्मांतरातून काय साध्य करायचे आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मुस्लिमांकडून कोणत्या प्रकारचे देशप्रेम हवे आहे? आणि संघ इस्लामला कशाप्रकारे पाहतो?‘ असे सहा प्रश्‍न कुमार यांना विचारण्यात आल्याचे सालीस यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

सालीस पुढे म्हणाले की , “जर हिंदू राष्ट्र हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे असेल तर दलितांना पुन्हा मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही नवे तत्वज्ञान तयार केले आहे का असे आम्ही विचारले. मात्र नवे तत्वज्ञान तयार केले असेल तर हिंदू धर्माला कोणतीही धार्मिक संस्कृती नाही आणि त्यामुळे कोणीही हिंदू धर्मांतर करू शकतो. तसेच घटनेने धार्मिक स्वातंत्र्य दिलेले असताना त्याबाबतच्या विधेयकाबाबत संघाला भीती का वाटते? आम्हाला भीती वाटत नाही. जर कोणत्याही इस्लाम व्यक्तीला धर्म सोडायचा असेल त्याने तो खुशाल सोडावा. सक्तीने मुस्लिम म्हणून राहण्यासाठी आम्ही कोणतेही बंधन घातलेले नाही. देशप्रेमाबद्दल बोलायचे असेल तर त्यांच्या पूर्वजांनी जिन्हा आणि पाकिस्तानला नाकारले आहे. 1947 साली जेव्हा दोन राष्ट्रांची कल्पना आली त्यावेळी आमच्या पूर्वजांनी जिन्हा आणि पाकिस्तानला नाकारले आणि गांधीजींना आमचा नेता म्हणून स्विकारले. भारत हा आमचा देश आहे आणि आम्ही भारतीय राज्यघटनेवर विश्‍वास दाखविला आहे.‘ असेही ते पुढे म्हणाले.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मुस्लिमांकडून काय हवे आहे? त्यांच्या कल्पनेप्रमाणे वंदे मातरम्‌ म्हणणे आणि भारतमातेच्या चित्रासमोर झुकणे? आम्हाला ते मान्य नाही. ते इस्लामच्या विरूद्ध आहे. जवळपास दीड तास चाललेल्या या चर्चेनंतर कुमार म्हणाले की, मुस्लिमांचे संमेलन आयोजित करावे त्यामध्ये मी या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देईल. पण मला वाटते ज्याअर्थी ते चार भिंतीच्या आत या प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकत नसतील तर ते संमेलनात या प्रश्‍नांची उत्तरे कशी देणार?‘ असा सवालही सालीस यांनी उपस्थित केला आहे.