नक्षल्यांनी घोट येथील लाकूड डेपो जाळला

0
18

गडचिरोली, दि.१८: सशस्त्र नक्षल्यांनी आज मध्यरात्री चामोर्शी तालुक्यातील घोट येथील लाकूड डेपोला आग लावली. या आगीत लाखो रुपयांचे बांबू व सागवान लाकडे जळून राख झाले. दरम्यान आज नक्षल्यांनी एटापल्ली तालुका बंद करण्याचे आवाहन केले आहे.आज मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास २० ते २५ सशस्त्र नक्षलवादी घोट येथील लाकूड डेपोवर गेले. त्यांनी केरोसीन ओतून बांबू व लाकडांना आग लावली. या आगीत सुमारे ५० लाखांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेनंतर पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास गडचिरोली व अहेरी येथील अग्निशमन वाहन तसेच आलापल्ली येथील वनविभागाचे वाहन घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बरीच लाकडे जळून राख झाली होती. हे लाकडी बिट जंगल कामगार सहकारी संस्थांचे असल्याची माहिती आहे.

घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रकेही टाकली. ३० मार्चला एटापल्ली तालुक्यातील रेकनार-हुमडी येथील जंगलात झालेली पोलिस-नक्षल चकमक बनावट असून, सोनू उसेंडी यास खोट्या चकमकीत ठार केल्याचा आरोप नक्षल्यांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ नक्षल्यांनी आज एटापल्ली तालुका बंदचे आवाहन केले आहे.