भोसरी MIDC भूखंड खरेदीप्रकरणी खडसेंना क्लीन चिट

0
12

पुणे,दि.01(विशेष प्रतिनिधी)- भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदीप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) खडसेंना क्लीन चिट मिळाली आहे. खडसेंविरुद्ध आरोप ‍सिद्ध न झाल्याचे एसीबीने आपल्या अंतिम अहवालात म्हटले आहे.पुणे एसीबीकडून मंगळवारी कोर्टात अंतिम अहवाल सादर करण्‍यात आला. त्यात खडसेंना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शासनाचेही कोणतेही नुकसान झाले नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. खडसेंना क्लीन चिट मिळाल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘एसीबीच्या क्लीनचिटमुळे आनंद वाटल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, मंत्रिपदासाठी आपण कधीही काम केले नाही. माझ्यावर आरोप करण्‍यासाठी एक मोठी यंत्रणा होती. खोटे आरोप करून बदनामी केल्याचा हा प्रयत्न होता. गेली दोन वर्षे माझ्यासह कुटुंबियांसाठी अस्वस्थतेची होती. मी निर्दोष होतो, न्याय मिळेल असा विश्वास होता.’एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे यांचा आज स्मृती दिन आहे. आणि आजच्या दिवशी खडसेंना क्लीन चिट मिळाली आहे.

पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील जमीन कुटुंबीयांच्या नावे करण्यावरून एकनाथ खडसे यांची आयोग नेमून चौकशी करण्यात आली. हे प्रकरण समोर आल्याने नैतिकतेच्या मुद्यावर खडसे यांचा राजीनामाही घेण्यात आला. चौकशी आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू असल्यानं अहवाल निरर्थक ठरल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ केली. मात्र आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं खडसेंना क्लीन चिट दिलीय. त्यामुळे आता खडसेंना मंत्रिमंडळात घेतले जाणार का, याची चर्चा सुरू झाली.