सहा संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार

0
6

अजुर्नी मोरगाव,दि.01ः-अजुर्नी मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीसह इतर पाच संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार असून, ५ मे पर्यंत लेखी स्पष्टीकरण तसेच आपली बाजू मांडावयाची असल्यास ८ मे रोजी दुपारी १ वाजता आवश्यक रेकॉर्ड, पुरावे व मुळ कागदपत्रांसह समक्ष हजर राहून लेखी जबाब सादर करण्याचे निर्देश गोंदियाचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संदिप जाधव यांनी दिले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के.ए. कुरेशी, संचालक विलास गायकवाड, प्रमोद लांजेवार, व्यंकट खोब्रागडे, नूतनलाल सोनवाने व यशवंत कापगते यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. कुरेशी, गायकवाड व लांजेवार हे सहकारी संस्था गटातून निवडून कृषी उत्पन्न बाजार समितीवर आले आहेत. व्यंकट खोब्रागडे व नूतनलाल सोनवाने हे ग्रामपंचायत गटातून निवडून कृउबासवर आले आहेत. तर यशवंत कापगते हे कोणत्याही क्षेत्रातून निवडून आलेले नसून, ते सध्या गावातील पोलिस पाटील आहेत. हे संचालक ज्या संस्था, गटातून निवडून आले, तेथील कलावधी संपुष्टात आला आहे. ते नंतरच्या निवडणुकीत त्या क्षेत्रातून निवडून आले नाहीत. तसेच त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभासदत्वाचा राजीनामा दिलेला नाही, अशी तक्रार भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील दिपराज ईलमकर यांनी ५ एप्रिल रोजी जिल्हा उपनिबंधकाकडे केली होती. या तक्रारीच्या आधारावर जिल्हा उपनिबंधकांनी २४ एप्रिल रोजी संबंधित संचालकांना नोटीस दिली आहे.