सरकारने शेतकऱ्यांचा भरोसा तोडला- राहुल गांधी

0
20

नागपूर/चंद्रपूर,दि.13(विशेष प्रतिनिधी) : देशातील एखादा उद्योगपती कोट्यवधी रुपये घेऊन देशाबाहेर पळून जाऊ शकतो, तर सरकारने देशातील शेतकऱ्यांचेही कर्जही माफ केले पाहिजे आणि हे सरकार सहज करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा विश्वास तोडला, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज बुधवारला ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी पोचले. तेथे त्यांनी कृषि संशोधक आणि एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर तेथून ते शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पायी चालत गेले. नादेंड येथील कार्यक्रमाला राहुल गांधी यांच्या सोबत  महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,माजी खासदार नाना पटोले,आमदार यशोमती ठाकूर,आमदार विजय वड्डेटीवार,माजी खा.नरेश पुगलीया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

त्यापुर्वी राहुल गांधी यांचे सकाळी ११ वाजता विशेष विमानाने नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील होते. विमातळावर माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, अनंतराव घारड, डॉ. बबनराव तायवाडे, नाना गावंडे, सुरेश भोयर, सुनिता गावंडे, अभिजित वंजारी, उमाकांत अग्नीहोत्री, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, माजी आमदार सेवक वाघाये, एस.क्यु. जमा, शेख हुसैन, संजय महाकाळकर, तक्षशिला वाघधरे, प्रज्ञा बडवाईक, कुंदा राऊत, मुजिब पठाण, गिरीश पांडव, प्रमोदसिंग ठाकूर, राजेश कुंभलकर, रवी घाडगे पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले.विमानतळाबाहेर कार्यकर्ते वाट बघत असल्याचे कळताच त्यांनी थोेडा वेळ काढून बाहेर येऊन कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केले.त्यानंतर ते हेलीकाॅप्टरने नांदेडकरीता रवाना झाले.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, ”जनतेचा पैसा बळकावून श्रीमंतांच्या खिशात भरला जात आहे. मोदी मूळ प्रश्न सोडून भलतेच मुद्दे समोर करतात. नेत्याचे काम देशाला विश्वास देण्याचे आहे, मात्र मोदी विश्वासघात करीत आहेत. रोजगार, शेतकरी प्रश्न, आरोग्य, शिक्षण महत्वाचे आहे, मात्र मोदींचे याकडे अजिबात लक्ष नाही. कर्जमाफीशी मोदींना काहीही देणेघेणे नाही.मोदी आपल्या मित्र उद्योगपतींसाठीच काम करीत आहेत. आम्ही सत्तेत येताच कर्नाटक आणि पंजाबमध्ये कर्जमाफी केली. एक वर्षाचे मनरेगाचे पैसे नीरव मोदी, विजय मल्ल्या घेऊन पळाले. एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. बड्या श्रीमंत उद्योगपतीना कर्ज माफ केले, शेतकऱ्यांना नाही.”जर सरकार उद्योगपतींना मदत करेल असेल तर, त्यांनी शेतकऱ्यांनादेखील मदत करायला हवी. शेतकऱ्यांचे रक्षण होऊ शकेल, इतका पैसा सरकारकडे नक्कीच आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही तो पैसा नक्कीच शेतकऱ्यांच्या खिशात टाकू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

नांदेड येथे येत असलेल्या भा. रा. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीसाठी एकूण ६० जणांची यादी एसपीजीला देण्यात आली होती. मात्र सुरक्षेच्या नावाखाली फक्त २२ जणांचीच यादी मंजूर झाल्याचे षडयंत्र भाजपाने सुरक्षेच्या नावावर रचल्याचा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.