नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 6 जवान शहीद, 10 जखमी

0
9
file photo

रांची,दि.27(वृत्तसंस्था)- झारखंडमधल्या गढवा जिल्ह्यात मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 6 जवान शहीद झाले. मंगळवारी संध्याकाळी पोलिसांना गढवामधल्या छिंजो या परिसरात नक्षलवाद्यांचे वास्तव्य असल्याचे कळले. त्यानंतर अन्य सुरक्षा यंत्रणांच्या मदतीनं इथे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.
वृ्त्तसंस्थेनुसार चहूबाजूंनी घेरल्यानंतर नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान नक्षलवाद्यांनी रस्त्यात लावलेल्या भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. ज्यात 6 जवान शहीद झाले. गढवातले पोलीस उपमहानिरीक्षक विपुल शुक्ला यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार जवळपास 10 जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर गढवा परिसराला छावणीचे स्वरूप आले असून, सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दुसरीकडे मंगळवारी झालेल्या नक्षली हल्ल्याच्या आधी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातही नक्षलवाद्यांनी असाच मोठा हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 9 जवान शहीद  झाले होते, तर 6 जवान जखमी झाले. सुकमा हल्ल्यात जवानांवर आयईडी स्फोटानं निशाणा साधण्यात आला होता. त्यानंतर नक्षल्यांनी गोळीबारही केला होता.