वीज गेल्याने सभागृह तहकूब;नाल्यांमध्ये दारुच्या बाटल्यांचा खच

0
10

नागपूर,दि.06(विशेष प्रतिनिधी) : अट्टहासाने नागपूरला पावसाळी अधिवेशन घेतल्यानंतर आज पहिल्याच पावसात विधीमंडळाचे अधिवेशन स्थगित करावे लागले. विधानभवनच्या पॉवर हाऊसमधे पाणी साचल्याने संपुर्ण वीज बंद करण्याची नामुष्की ओढावल्याने विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच वीज गायब झाल्याने सभागृह स्थगित करावे लागले. नागपुरात पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. कामकाज सुरू होण्यापूर्वीच वीजपुरवठा खंडीत झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच आजचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत सडकून टीका केली आहे. तर दुसरीकडे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीजपुरवठा खंडीत झाला नसून तात्पुरता बंद करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

नागपुरात गुरुवारी (5 जुलै) रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळेच येथील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका हा विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनालाही बसला आहे. मात्र आता पाणी साचण्यामागचं एक कारण समोर आलं आहे. विधानभवन परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्यांचा खच पडला आहे.

विधानभवनात येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरीकांच्या ओळखपत्राची मोबाईलच्या बॅटरीमधून तपासणी करण्यात येत होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या निष्काळजीपणावर टीका केली. अजित पवार यांनी तर संताप व्यक्त करत कशाला केला होता अट्टहास ? मुहूर्तावर अधिवेशन घेतले तरी संकट टाळता आले नाही काय ? असा सवाल केला. पॉवर हाऊस मधे पाणी गेल्याने धोक्‍याचा इशारा म्हणून जनरेटर देखील सुरू करण्यास अधिकार्यांनी मज्जाव केला. विधानभवनाचे हे हाल तर महाराष्ट्राचे काय हाल असतील असा सवाल विरोधी आमदार सत्ताधारी आमदारांना विधानभवनात्या आवारात विचारत होते .

धनंजय मुंडेंचे ट्विट…

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंबंधी ट्विटही केले आहे. “विधिमंडळाच्या इतिहासात अधिवेशन काळात लाईट जाऊन कामकाज बंद पडावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारचा नियोजनशून्य कारभार, नागपूरला अधिवेशन घेण्याचा निरर्थक बालहट्ट यामुळे ही वेळ आली आहे.” दुसऱ्या ट्विटमध्ये मुंडे म्हणतात, “राज्यात जलयुक्त शिवार अयशस्वी झाले असले तरी सरकारने नागपूरात पावसाळी अधिवेशन घेऊन ‘जलयुक्त नागपूर’ असल्याचे मात्र दाखवून दिले आहे.”