नागपूर पाण्याखाली,वाहतूक विस्कळीत

0
10

नागपूर, दि.6 : काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे नागपूर शहर पाण्याखाली गेले आहे. संततधार पावसामुळे अनेक वस्त्यात पाणी शिरले असून विधानभवन परिसरही पाण्याखाली गेला आहे. सकाळी 8.30 ते 11.30 या तीन तासांत शहरात 162.7 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. या पावासाचा फटका विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बसला आहे. विधान भवन परिसरात पाणी तुंबले आहे. इतिहासात पहिल्यांदाच पाऊस आणि वीज गुल झाल्याने विधिमंडळाचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्‍यात आले आहे. त्यात लालबाग पूलावर ट्रक उलटल्याने वाहतूक दुसरीकडून वळवण्यात आली आहे.

महानगर पालिकेत असलेल्या स्मार्ट सिटी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने तुंबलेल्या स्थळांची पाहणी केली. आपातकालीन यंत्रणा तातडीने कामाला लावण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंह, स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान माहिती सचिव एसपीआर श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आदी उपस्थित होते.