संसदेत नायडूंची गोची, आधी टीका नंतर माफीनामा !

0
17

नवी दिल्ली-‘तुम्हा लोकांना ऐकण्याची शिस्त नाही… जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका नाहीतर इथून परदेशात चालते व्हा’ अशी टीका करणारे केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू आज चांगलेच अडचणीत सापडले. त्यांच्या टीकेवरून संसदेत चांगलाच गोंधळ उडाला. अखेर विरोधकांच्या जोरदार आक्षेपानंतर नायडूंना माफीनामा सादर करावा लागला.

संसदेत आज (गुरूवारी) रेल्वे बजेट सादर करण्यात आलं. पण त्याअगोदर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानंतर आभाराचं भाषण करताना केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू विरोधकांवर भलतेच बरसले. ‘तुम्हा लोकांना ऐकण्याची शिस्त नाही…जर तुम्हाला ऐकायचं असेल तर एका नाहीतर इथून परदेशात चालते व्हा आणि पुढची पाच वर्ष तिथेच राहा अशी टीकाच नायडूंनी केली. मात्र नायडूंच्या या टीकेमुळे विरोधक चांगलेच संतापले. जोवर व्यंकय्या नायडू माफी मागत नाहीत तोवर सभागृहाचं काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा विरोधकांनी लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे दिला होता. तर दुसरीकडे नायडूंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक दिल्लीत झाली. त्यात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत माफीची मागणी केली होती.

दरम्यान, नायडूंनी दिलगिरी व्यक्त करूनही, विरोधकांनी दिलगिरी नको विरोधकांना हवी माफी अशी मागणी विरोधकांनी लावून धरल्यानंतर लोकसभेचं सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. अखेर राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात. पण मी, कुठल्याही अपशब्दाचा वापर केला नाही. माझ्या मनात प्रत्येक खासदाराबाबत आदर असून मी दिलगिरी व्यक्त करतो, असं स्पष्टीकरण व्यंकय्या नायडू यांनी दिलं.