बनावट बदल्यांची फाईल मंत्रालयात

0
6

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेतील बोगस बदल्या प्रकरणात ९ मार्चपासून विधी मंडळ अधिवेशनात उपोषण करण्याचा निर्णय शिक्षक व पदवीधर आमदारांनी जाहीर केला असून यासंदर्भात ग्रामीण विकास मंत्र्यांना तसेच विधी मंडळ सचिवांना नोटीस देण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेतील बोगस बदल्या रद्द करून याप्रकरणात दोषी असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची घोषणा नागपूर येथील विधी मंडळाच्या अधिवेशनात ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. शिक्षक आ. ना. गो. गाणार यांनी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सदर बाब स्पष्ट केली होती. मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही याप्रकरणातील दोषी अधिकारी अद्याप मोकळे आहेत. २२0 बोगस बदलीधारक शिक्षकांवर कारवाई करण्यास विलंब करण्यात आला आहे. त्यामुळे ९ मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाअगोदर जिल्ह्यातील बोगस बदली घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करून २२0 शिक्षकांच्या बोगस व नियमबाह्य बदल्या रद्द न करण्यात आल्यास ९ मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. रामनाथ मोते, आ. ना. गो. गाणार, आ. प्रा. अनिल सोले हे विधी मंडळाच्या पायर्‍यांवर उपोषण करणार असल्याची नोटीस विधी मंडळ सचिव, ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेत रूचेश जयवंशी मुख्य कार्यकारी अधिकारी असताना पदाधिकार्‍यांच्या संगणमताने स्कॅन करून शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. याप्रकरणात ५ कोटींवर अधिक रकमेची आर्थिक उलाढाल झाली होती. सदर प्रकरण लोकमतने उचलून धरले होते. परंतु आघाडी सरकारच्या काळात राजकीय दबावामुळे या प्रकरणात कारवाई करण्यास अडचण येत होती, हे विशेष.