सीमावर्ती भागातील वनजमीन मोकाट

0
10

राजुरा- कोरपना तालुक्याच्या सीमावर्ती भागात वनविभागाच्या वनसडी बिटाअंतर्गत जवळपास ६५0 एकर पडीत वनजमिन आहे. या परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण, अवैध उत्खनन केले जात आहे. येथे मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल तयार झाले असल्याने वन्य प्राण्यांचा संचारही वाढला आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून वनविभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
भोयेगाव शेतशिवारालगत ते जैतापूर, वर्धा नदीलगत ते कुर्ली, मारडा गावाजवळील शेतशिवारापर्यंत अशी विस्तीर्ण वनविभागाची ६५0 एकर जमिन आहे. हा परिसर दर्‍याखोर्‍यांनी वेढला असून मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल वाढले आहे. या परिसरात मुबलक मोठ्या मुरुम, दगड यासारखी संपत्ती आहे. परंतु, वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे ही वनसंपत्ती लुटली जात आहे. तर या मोकाट जमिनीवर काही ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. त्यामुळे भविष्यात ही वनजमिन गिळकंृत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वनविभागाने दहा-पंधरा वर्षापूर्वी याठिकाणी वृक्ष लागवड केली होती. त्यासाठी वनरक्षक, पहारेकरी ठेवण्यात आले होते. परंतु, कालांतराने वनरक्षक, पहारेकरी बेपत्ता झाले तर केलेले प्लाटेशनही गायब झाले. तेव्हापासून या भागाकडे मात्र वनविभागाचे दुर्लक्षच होत आहे. या वनजमिनीवर अनेकांचा डोळा असून येथील संपत्ती लुटल्या जात आहे. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष न दिल्यास ही वनजमिन गिळंकृत झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.