गडचिरोलीत 70 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला

0
14

गडचिरोली,दि.16 : गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागाचा संपर्क तुटला आहे. रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने पर्लकोटा, इंद्रावती नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे तालुका मुख्यालय असलेल्या भामरागडसह 70 पेक्षा जास्त गावांमधे जाणारे मार्ग बंद झाले आहेत. भामरागडलगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीवरुन 3 फूट पाणी वाहत आहे. नदीचे पाणी गावालगतच्या घरापर्यंत पोहोचले. भामरागडपासून काही अंतरावर पर्लकोटा, इंद्रावती आणि प्राणहिता या तीन नद्यांचा संगम आहे. या तीनही नद्यांचा प्रवाह आणखी वाढल्यास पर्लकोटा नदीचे पाणी भामरागडमधील घरांमधे शिरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्यावर्षी अशाच पद्धतीनेच नदीचे पाणी गावांत शिरल्याने हाहाकार उडाला होता. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून बोटसह संपूर्ण यंत्रणा कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.