पंढरीत भाविक दाखल, यंदाच्या आषाढी शासकीय महापुजेचा मान वारकऱ्याला

0
21

पंढरपूर ,दि.22(विशेष प्रतिनिधी)- ‘अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटीन माहेरा आपुलिया’ अशी आस उराशी बाळगून आषाढी यात्रेच्या आनंदसोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे लाखांहून अधिक वारकरी येथे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत यंदा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या शासकीय महापुजेचा मान वारकऱ्याला मिळणार अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला जाणे टाळल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. महापुजेला पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. मात्र महापुजेचा मान वारकऱ्याला दिला जाणार आहे असे सुत्रांकडून समजते.

बहुतांश भागांत चांगला पाऊस झाला असल्याने वारकऱ्यांनी यात्रेसाठी यंदा मोठी गर्दी केली आहे. दर्शन रांगेत आजही मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत होती, त्यामुळे काही जणांना दर्शनासाठी तब्बल १९ तास लागत होते.केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातूनदेखील वारकरी येथे आले आहेत. आज रात्रीपर्यंत सुमारे चार लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झाले होते. यंदाही पंढरीच्या राजस सुकुमाराला डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी अनेक अडचणींना तोंड देत लाखो वारकरी दर्शनाच्या रांगेत उभे आहेत.

दरवर्षी मुख्यमंत्र्यांबरोबरच रांगेतील पहिल्या वारकरी जोडप्यालाही पुजा करण्याचा मान मिळत असतो. मात्र यंदा मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत फक्त या जोडप्याच्याच हस्ते शासकीय महापुजा होणार आहे. यावेळी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थितीही असेल. मात्र पुजेचा मान मिळेल तो वारकरी दाम्पत्याला