हिंगोलीच्या जाधव दाम्पत्याकडून विठूरायाची पूजा; प्रथमच वारकऱ्याला शासकीय महापुजेचा मान

0
9

पंढरपूर,दि.23(विशेष प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठलाच्या शासकीय महापुजेचा मान मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी हिंगोली येथील जाधव दांम्पत्याला देण्यात आला. वर्षा आणि अनिल जाधव या वारकरी दांम्पत्याच्या हातून पाहाटे साडे 3 वाजेच्या सुमारास विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली. यावेळी शासनाच्या वतीने पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दिवाकर रावते, बबनराव लोणीकर आणि बबनराव पाचपुते उपस्थित होते.

महाराष्ट्र असुरक्षित झाला असून विविध प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वत्र अशांतता पसरली आहे. शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहेत. त्यामुळे ‘पांडुरंगा! राज्यात सुख, शांती नांदो!’अशी प्रार्थना वारकरी अनिल जाधव यांनी विठुरायाच्या चरणी केली. दरवर्षी मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. मात्र काही संघटनांनी फडणवीस यांना पूजा करु देणार नाही, अशी भूमिका घेतल्यानं मुख्यमंत्र्यांनी पुजेला न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथमच शासकीय पूजा करण्याची संधी वारकऱ्यांना मिळाली. हा मान जाधव दाम्पत्याला मिळाला.
लाखो वारकऱ्यांमधून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. शासकीय महापूजेनंतर मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भपसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राणा जगजितसिंह पाटील, दिग्विजय सिंह, माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, साधना भोसले, शकुंतला नडगिरे यांच्यासह कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे, पोनि श्रीकांत पाडुळे यांच्यासह मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंढरीत श्री विठ्ठलाची पूजा सुरू होताच आपल्या वर्षा या निवासस्थानी सपत्नीक पूजा केली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरीत न जाण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपण पहाटे आपल्या निवासस्थानीच श्री विठ्ठलाची पूजा करणार असल्याचे जाहीर केले होते.