ओबीसी आमदार-खासदारांकडून समाजहिताची अपेक्षा चुकीची- खा. राजकुमार सैनी

0
12

मुंबई,दि.07 (सुरेश भदाडे)- ओबीसी समाजातील आमदार-खासदार हे फक्त राजकीय पक्षांच्या हाताखालची खेळणी आहेत. या समाजातील लोकप्रतिनिधींनी पक्ष प्रमुखांच्या पुढ्यात नांगी टाकल्याने समाजाची फसगत होत आहे. परिणामी, अशा लाचार आमदार खासदारांकडून ओबीसी बांधवांनी समाज हिताची अपेक्षा ठेवू नये, असे स्पष्ट प्रतिपादन खासदार राजकुमार सैनी यांनी व्यक्त केले.

ते मुंबई येथे आयोजित ओबीसी महासंघाच्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात आपले विचार मांडताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आपल्याला आपला राजकीय वाटा आणि हक्क मिळवून घ्यायचे असतील तर दुसऱ्या पक्षाची गुलामगिरी सोडून स्वतःचा पक्ष निर्माण करावा लागेल. न्याय प्रक्रियेतील आमचा वाटा हिरावल्या गेल्याने आपल्या समाजावर सातत्याने अन्याय होत आला आहे. आता ओबीसी आयोगाल संवैधानिक दर्जा मिळाला असला तरी  आयोगाचा अध्यक्ष हा ओबीसीच राहणार का आणि असला तरी तो कोणाच्या इशाऱ्यावर नाचणारा तर नसेल, या बाबत साशंकता कायम आहे. केंद्रात फक्त 12 टक्के ओबीसी नोकरीवर आहेत.माजी खासदार हनुमंतराव म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय लोकांना घेऊन कामाला सुरवात केली. मंडल आयोग सुद्धा लागू झाले .पण, त्याचा लाभ  हा मिळालाच नाही. एससीएसटी प्रमाणे ओबीसी संसदीय समिती तयार करण्याचे काम केले.आम्हालाच क्रिमिलेयरची गरज का ? क्रिमिलेयर हटविण्याचे काम का केले जात नाही?  क्रिमिलेयर हटवले तर आयएएस-आयपीएस आमची मुले होतील. “वोट हमारा  तो राज भी हमारा होना चाहिये”असेही ते म्हणाले

राज्यसभा खासदार अली अनवर अंसारी म्हणाले की, ज्या़ची स़ंख्या जेवढी,  तेवढीच त्यांची सहभागिता असली पाहिजे.  आम्ही क्षुद्र आहोत.  हिंदु वा मुसलमान आम्ही सर्व एक समान आहोत. ५२ टक्के लोकसंख्या असून नाममात्र २७ टक्के आरक्षण दिले.  तेही मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मुख्यमंत्री महोदय तरूण आहेत. भेदभाव मिटल्याचे ते सांगतात. मग आमच्या हिस्स्याच्या जागा द्या ना. आमच्या नोकऱ्या आम्हाला द्या. बेरोजगारी हटवा. संविधानात ५० टक्के आरक्षणाचा उल्लेख नसताना तसा जाणीवपूर्व अपप्रचार धूर्तमंडळी करीत आहेत. एकदा जातीनिहाय जनगणना तर करा, कोणाचे किती ते स्पष्ट होईल.