“बनावट शिष्यवृत्ती’ चौकशीसाठी “एसआयटी’

0
13

मुंबई/गडचिरोली – अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाचे प्रवर्ग वगळता इतर ओबीसी, डीटी, एनटी, व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क परिपूर्तीमध्ये बनावट विद्यार्थी दाखविले जात असल्याचे उघड झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चौकशी पथक स्थापन करण्याचा आदेश दिल्याचे समजते.दरम्यान या घोटाळ्यातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात “एससी‘ व “एसटी‘ प्रवर्गातील बनावट लाभार्थ्यांची प्रकरणे काही दिवसांपूर्वी उजेडात आली होती. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना केंद्राने शिष्यवृत्ती देणे बंद केले होते. त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. याचबरोबर राज्य सरकार देत असलेल्या शैक्षणिक शुल्क परिपूर्तीमध्ये काही बनावट लाभार्थी असल्याची प्रकरणेही पुढे आली आहेत. या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात येणार आहे. हे पथक तीन महिन्यांत अहवाल देणार आहे. यानंतर राज्य शासन पुढील कारवाई करणार असल्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळात दिल्याचे सूत्रांकडून समजते.

शिष्यवृत्ती घोटाळ्यातील आरोपींना 5 मार्चपर्यंत कोठडीत वाढ
बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेले आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली येथील प्रकल्प कार्यालयाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके, विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तुकाराम बरगे, वरिष्ठ लिपिक विजय उकंडराव बागडे व संजय दयानंद सातपुते या चारही जणांच्या पोलिस कोठडीत जिल्हा न्यायालयाने ५ मार्चपर्यंत वाढ केली आहे.
तपासादरम्यान शिष्यवृत्ती घोटाळयात अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २२ फेब्रुवारीला आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके यास नागपुरातून, तर समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तुकाराम बरगे यास गडचिरोलीतून अटक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी समाजकल्याण विभागातील वरिष्ठ लिपिक विजय बागडे व आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ लिपिक संजय सातपुते यांनाही अटक करण्यात आलीी. या चौघांनाही सोमवारी (ता.२३) मुख्य न्याय दंडाधिका-यांनी ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने २८ फेब्रुवारीला सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यां‍च्या पोलिस कोठडीत ३ मार्चपर्यंत वाढ केली होती. ही मुदत संपल्याने त्यांना पुन्हा आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत ५ मार्चपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचा मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील प्रकरणाचा तपास करीत आहेत.