सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई, जलसंधारणाच्या कामांमधील भ्रष्टाचार उघड

0
22

सोलापूर : जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांची दबंगगिरी पाहायला मिळाली. दुष्काळ निवारण निधीतील जलसंधारणाच्या कामामध्ये झालेला मोठा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणला आहे.
दुष्काळाचा कोट्यावधी रूपयाचा निधी अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगनमताने लाटल्याचा प्रकार समोर येताच त्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे बंधाऱ्यावर दाखल झाले. मंद्रूप येथील दोन निकृष्ट बंधारे त्यांच्या उपस्थितीत पाडण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी केलेली ही कारवाई राज्यातली हि सर्वात पहिली आणि धाडसी कारावाई मानली जाते आहे.
शासनाने सिमेंट बंधाऱ्यासाठी टंचाई निधी दिली होता. त्या निधीतून मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे दोन सिमेंट बंधाऱ्याची कामे सुरू होती. मात्र, ती निकृष्ठ असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्यानंतर त्या बंधाऱ्याची सकाळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पाहणी करून ते दोन्ही बंधारे जेसीबीच्या सहायाने पाडले. त्याचबरोबर याला जबाबदार असणाऱ्या लघु पाटबंधारे (स्थानिक स्थर) विभागाचे उपअभियंता प्रवीण मुदगल यांना निलंबित केल्याची माहिती श्री. मुंढे यांनी दिली.

जिल्हाधिकारी मुंढे आज सकाळी नऊच्या सुमारास मंद्रूप येथे गेले होते. त्याठिकाणीच्या सारोळे शेत व साठे शेत येथील सिमेंट बंधाऱ्याची त्यांनी पाहणी केली. त्या दोन्ही बंधाऱ्याने काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते दोन्ही बंधारे जेसीबीच्या सहायाने पाडून टाकले.

सात लाख 68 हजार व आठ लाख 45 हजार रुपये या दोन्ही बंधाऱ्याला मंजूर झाले होते. या दोन्ही बंधाऱ्याचे काम अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे झाले नसल्याचे दिसून आले. ज्याठिकाणी या बंधाऱ्याच्या कामाला मंजूरी दिली आहे. त्याऐवजी दुसऱ्याच ठिकाणी काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. बंधाऱ्याच्या दोन्ही कठड्याचे अंतर कमी असल्याचे दिसून आले. विलास चव्हाण यांच्या दुर्गामाता कन्स्ट्रक्‍शन यांच्यावतीने ही कामे सुरू होती. 2013-14 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्र्यांनी टंचाई काळात दिलेल्या निधीमधून ही कामे सुरू आहेत.

यावेळी प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, अन्नधान्य वितरण अधिकारी दिनेश भालेदार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रफीक नाईकवाडी, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) चे कार्यकारी अभियंता श्री. कारीमुंगी उपस्थित होते. मुंढे म्हणाले, ‘नाला बांधाचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे तसेच लाईनआऊट प्रमाणे झाल्याचे दिसत नाही. त्याचबरोबर हे काम वेळेत सुरु झाले नाही त्याचबरोबर वेळेत पुर्णही झाले नाही. जे चुकीचे काम झाले आहे ते पाडून पुन्हा नव्याने उभारण्यात येईल.‘‘