पंतप्रधान १० मार्चपासून ३ देशांच्या दौऱ्यावर

0
15

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंका या तीन देशांच्या दौऱ्यावर १० मार्च रोजी रवाना होणार आहेत.

नव्या वर्षातील (२०१५) पहिल्या विदेश दौऱ्यामध्ये पंतप्रधान १० ते १४ मार्च यादरम्यान तीन देशांना भेटी देतील असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. पहिल्या दिवशी सेशेल्सचे अध्यक्ष जेम्स ऍलेक्सिस मिशेल यांच्यासोबत समुद्री हद्दीतील द्विपक्षीय संबंध सुधारणे, तसेच विकासातील सहकार्य वाढविणे याबाबत चर्चा करतील.

मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मॉरिशसचे समपदस्थ सर अनिरुद्ध जगन्नाथ यांच्यासोबत ११ व १२ मार्च रोजी मोदी सविस्तर चर्चा करणार आहेत.

दौऱ्याच्या अखेरीस १३, १४ मार्च रोजी श्रीलंका भेटीत पंतप्रधान मोदी हे श्रीलंकन अध्यक्ष मैत्रीपाल शिरिसेना व इतर नेत्यांना भेटतील.
समुद्री हद्दीला लागून असलेल्या शेजारी देशांच्या दौऱ्यातून हिंदी महासागराच्या प्रदेशातील शेजाऱ्यांशी संबंध दृढ करण्याची भारताची इच्छा अधोरेखित होते, असे परराष्ट्र खात्याने सांगितले.