ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक डिसेंबरपासून मोबाईल बंदी

0
12

चंद्रपूर, दि. १७ : सफारीच्यावेळी पर्यटकांना वाघ आणि अन्य वन्यजीवांना भ्रमणध्वनीत आता कैद करता येणार नाही. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने ताडोबाच्या आता पर्यटकांना मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. ही बंदी १ डिसेंबर २०१८ पासून लागू होईल.
ताडोबात जगभरातील पर्यटक येतात. देशातील वाघांची संख्या सर्वाधिक ताडोबात आहे. आलेल्या पर्यटकांना आपल्या भ्रमणध्वनीमध्ये येथील वन्यजीवांना आतापर्यंत कैद करता येत होते. परंतु यामुळे अनेकदा ताडोबा व्यवस्थापनसमोर अडचणी निर्माण झाल्या. वन्यजीव सुद्धा धोक्यात आले. अशा अनेक घटना घडल्या आहे. अलिकडेच पर्यटकांनी वाघांचा रस्ता अडविल्याचा व्हिडीओ समाजमाध्यवार पसरला. एक वाघीण एक जिप्सीच्या मागे धावत असल्याचेही व्हिडीओ समोर आला. त्यानंतर आता पर्यटक, जिप्सी वाहनचालक व गाईड यांना व्याघ्र क्षेत्रात सफारीच्या वेळेत भ्रमणध्वनी घेवून जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला अहे. या प्रतिबंधाचे उल्लंघन झाल्यास जिप्सी चालक, गार्डड आणि पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पातून तत्काळ बाहेर काढले जाईल, असे आदेश ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांनी आज काढले.
सफारीच्या वेळी वाघ अथवा बिबट या वन्यप्राण्यांची साईटींगची माहिती झाल्यास पर्यटक, मार्गदर्शक़ व जिप्सी वाहन चालक एकमेकांना भ्रमणध्वनीद्वारे सुचित करतात. त्यामुळे इतर जिप्सी वाहन चालक त्याठिकाणी पोहचायला व्याघ्र क्षेत्रातील वेग मर्यादात ओलांडून भरधाव वाहन चालवितात. यामुये पर्यटक, जिप्सी वाहनचालक, गाईड आणि वन्यप्राणी यांच्या जीवास धोका उद्भवू शकतो. एकाच जागी पर्यटकांची गर्दी होत असल्याने वन्यप्राण्यांचा मार्ग रोखला जातो. या घटना व्याघ्र संवर्धनास व पर्यटनास हानिकारक आहे.