भाजपने केंद्रात सत्तेवर येताच भेल बंद पडला- शरद पवार

0
9
????????????????????????????????????
शरद पवारांचा आरोप : रिलायंस समुहाच्या कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन
गोंदिया ,दि.23: प्रफुल्ल पटेल केंद्रात अवजड उद्योग मंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात औद्योगीक क्रांती घडवून आण्याकरिता भेल उद्योग प्रकल्पाला गळ घालत या जिल्ह्यांत प्रकल्प तयार करण्याची मागणी केली. त्याकरिता जमिनीपासून इतर परवानग्या घेण्यात आल्या. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर रितसर पायाभरणी देखील करण्यात आली. परंतु, त्यानंतर केंद्रात सरकार बदलले.भाजपच्या सरकारने सर्व प्रक्रीया आणि परवानग्या पूर्ण झाल्यानंतर देखील या प्रकल्पाला रद्द केले. त्यामुळे या जिल्ह्यात होणारी औद्योगीक क्रांतीला खीळ बसली. येत्या चार ते पाच महिन्यांत निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत आम्ही सत्तेत येण्याची आशा आहे. आमची सत्ता आल्यास सर्वप्रथम भेल प्रकल्पाला परवानगी देवून तो प्रकल्प सुरू करण्यात येईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले. रिलायंस समुहाच्या वतीने शहरानजीक असलेल्या डव्वा येथे कर्करोग डे केअर सेंटरचे उद्घाटन शरद पवार यांच्याहस्ते आज(ता.२३) करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल्ल पटेल होते. यावेळी रिलायंस समुहाच्या टिना अंबानी, अनमोल अंबानी, वर्षा पटेल, आमदार गोपाल अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, खासदार मधुकर कुकडे, जि.प. अध्यक्ष सिमा मडावी, माजी आमदार राजेंद्र जैन, अनिल देशमुख, प्रकाश गजभिये तुषार मोतिवाला आदी उपस्थित होते. श्री पवार पुढे म्हणाले, आजार काय असतात याचा मी प्रत्यक्षदर्शी आहे. कर्करोग ते पायाचे दुखणे आणि इतर आजार मी स्वत: अनुभवले आहेत. परदेशात असणाऱे तंत्रज्ञान रिलायंसने तयार केलेल्या केंद्रात उपलब्ध आहे. कर्करोगाशी दूर राहण्याकरिता व्यसनांपासून दूर राहावे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविकात टिना अंबानी म्हणाल्या, संपूर्ण देशात कर्करुग्णाच्या सेवेकरिता डे केअर सेंटर उभारण्यात येत आहेत. अकोला नंतर गोंदिया येथे हे सेंटर उभे राहिले. याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात सेंटर उभारण्यात येणार आहेत. गुजरातची मुलगी आणि सून असली तरी महाराष्ट्राशी विशेष नाते आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहास्तव हे केंद्र उभारण्यात आले आहे.
खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, रिलायंस समुहाने गोंदियात केंद्र सुरू करून मागासलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर केली. हे रुग्णालय इथपर्यंत मर्यादित न ठेवता मुंबई येथील कोकीळाबेन रुग्णालयासारखे प्रत्येक आजारावर उपचार होईल, असे रुग्णालय तयार करावे. अंबानी कुटुंबाशी घरचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मी अजूनही सुविधा तयार करण्याची मागणी करणार आहे. सर्वसोयीयुक्त विमानतळ असल्यामुळे या समुहाने गोंदियात पाऊल टाकल्याचेही त्यांनी सांगीतले.