जेवणातून १७४ विद्यार्थ्यांना विषबाधा

0
10

भंडारा,दि.23ः- शहरात सुरू असलेल्या आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घटनानंतर देण्यात आलेल्या जेवनातून अन्न आणि पाण्यातून १७४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यांना मळमळ, डोके दुखी, हगवण, उलटया यांचा त्रास होत असून त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ९७ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून उपचारानंतर त्यांना क्रीडा संकुलात विश्रांतीसाठी पाठविण्यात आलं आहे. सध्या १९ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यात १५ मुली, ४ मुलांचा समावेश आहे. पूर्व विदर्भातील अनुदानित व विना अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा भंडारा येथील शिवाजी क्रीडा संकुल मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास २५०० मुले या स्पर्धेत सहभागी झाली होती. काल दुपारी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर मुलांना जेवण देण्यात आले. जेवणानंतर काही वेळातच मुले आणि शिक्षकांना मळमळ, उलट्या व हगवणीचा त्रास सुरू झाला. यातील १७४ जणांना लगेच सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. यापैकी १९ जणांना उपचारासाठी दाखल करून इतर लोकांना रात्री सुटी देण्यात आली आहे. बाधित रुग्णांनी क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांना या घटनेबद्दल दोष दिला आहे. मात्र, आयोजकांनी गलथानपणाचा आरोप फेटाळला आहे. सदर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी दोन हजार ७०० मुलांसह ३०० शिक्षकांनी सहभाग नोंदविला आहे. पाच जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होत असताना जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धेचे व्यवस्थापन ढासळल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांसाठी चटई, गाद्या व आरोच्या पाण्याची व्यवस्था अपुरी असल्याचेही खेळाडूंनी यावेळी सांगितले.