नक्षल चकमकीत दोन जवान शहीद, एक जखमी

0
9

गडचिरोली,: एटापल्ली तालुक्यातील छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील हिकेर जंगलात दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पोलिस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत दोन जवान शहीद तर एक जवान जखमी झाला. दोगे आत्राम व स्वरुप अमृतकर अशी शहीद जवानांची नावे आहेत. दोगेआत्राम हा एटापल्ली तालुक्यातील कांदोळी(बुर्गी) येथील, तर स्वरुप अमृतकर हा गडचिरोली येथील रहिवासी आहे. दिनेश हिचामी हा जवान चकमकीत जखमी झाला.
दुपारी सी-६० पथकाचे जवान गट्टा(जांभिया) पोलिस मदत केंद्रांतर्गत हिकेर जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना अम्बुश लावलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र या चकमकीत दोगे आत्राम व स्वरुप अमृतकर हे जवान घटनास्थळीच शहीद झाले. या चकमकीत दिनेश हिचामी या जवानाच्या खांद्याला गोळी लागली. हिकेर परिसर दुर्गम असल्याने व घटनेनंतर रात्र झाल्यानंतर हेलिकॉप्टर तेथे पोहचू शकले नव्हते. आज(ता.२३) सकाळी शहीद जवानांचे पार्थिव गडचिरोली येथे आणण्यात आले. दुपारी १ वाजता गडचिरोली येथील पोलिस मुख्यालयाच्या पटांगणावर मानवंदना आली. यावेळी शहीद जवानांचे आप्तेष्ट, पोलिस कर्मचारी व उपस्थितांना शोक आवरता आला नाही. जिल्हाधिकारी श्री.रणजितकुमार, मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता, विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम, नक्षल सेलचे पोलिस महानिरीक्षक श्री.अनुपकुमार, पोलिस अधीक्षक संदीप पाटील आदींनी शहीद जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण श्रद्धांजली अर्पण केली. मात्र पालकमंत्री, खासदार व आमदारांची अनुपस्थिती सर्वांना खटकत होती. दिवंगत आर.आर.पाटील गृहमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री असताना अशा दु:खदायक घटनेच्या वेळी ते आवर्जून हजर असायचे. परंतु यावेळी कुणीही हजर न राहिल्याने उपस्थितांमध्ये असंतोष व्यक्त केला जात होता.
स्वरुप अमृतकर हा गडचिरोली येथील नवेगाव(मुरखळा) येथील रहिवासी आहे. ३० जुलै १९८७ ला जन्मलेल्या स्वरुपचे शिक्षण गडचिरोली येथील शिवाजी हायस्कूलमध्ये झाले. २००८ मध्ये तो पोलिस दलात भरती झाला.मनमिळाऊ स्वभावासाठी परिचित असलेला स्वरुप शहीद झाल्याची वार्ता कळताच गडचिरोलीवासीयांवर शोककळा पसरली आहे.