दूषित पाण्यामुळे तळेगावात अतिसाराची लागण; १९ जण भरती

0
16

गडचिरोली, दि.२४: कुरखेडा तालुक्यातील तळेगाव येथील एका खासगी विहिरीतील दूषित पाण्याच्या वापरामुळे अनेक जणांना उलटी, हगवण व मळमळ सुरू झाल्याने १९ जणांना येथील उपजिल्हा रुग्णालयात, अन्य काही जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तळेगाव येथील सार्वजनिक पाणीपुरवठा नळयोजनेची पाईपलाईन फुटल्याने आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे गावकरी सार्वजनिक विहिरी,हातपंप व खासगी विहिरीतील पाण्याचा वापर करीत आहेत.

दरम्यान आज सकाळी वामन उईके यांच्या खासगी विहिरीतील पाण्याच्या वापरामुळे अनेकांना उलटी व हगवणीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सरपंच शशिकला कुमरे यांनी रुग्णवाहिकेद्वारे रुग्णांना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.दीपक नैताम(३२), सुरेखा नैताम (२०), वाहलू सहारे (५८), अमित दाणे (२१), सुनंदा नैताम (६०), कामुना मलकाम (६५), जानिका मलकाम (१४), शीला नैताम (६८), करुणा नैताम (४०), भुपेश उईके (२७), चांगेश उईके (२९), शशिकला मडावी (६२), मचिंद्रनाथ जुमनाके (२३), निर्मला राऊत (४०), रीना जुमनाके (२९), विद्या राऊत (३०), हर्षा उईके (४०), ज्योत्स्ना राऊत (१९), हिरा जुमनाके (४५) अशी रुग्णांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच तळेगाव येथे वैद्यकीय चमू पाठविली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश दामले यांनी सांगितले.पाणी दूषित असूनही येथील जलरक्षक सुभाष गद्देवार हे हेतुपुरस्सर विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.