तेलंगण चकमकीचे सीमी कनेक्शन

0
8

वृत्तसंस्था
नालगोंडा – दोन वर्षांपूर्वी मध्यप्रदेशच्या खांडवा तुरुंगातून फरार झालेले सीमीचे दोन सदस्य तेलंगणच्या नालागोंडा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले.
मोहोम्मद इजाउद्दीन आणि मोहोम्मद अस्लम अशी या दोघांची नावे असून, तीन ऑक्टोंबर २०१३ च्या रात्री मध्यप्रदेशच्या खांडवा तुरुंगातून हे दोघे फरार झाले होते.
सीमीचे एकूण पाच सदस्य त्या रात्री तुरुंगातून फरार झाले होते. या चकमकीमध्ये पोलिस शिपाई नागा राजू यांचा गोळी लागून मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक बाळा गंगी रेड्डी आणि उपनिरिक्षक सिध्दया गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी सूर्यापेठ भागातील बस स्थानकावर झालेल्या गोळीबारात इजाउद्दीन आणि अस्लम सहभागी होते. या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता. इजाउद्दीन आणि अस्लमने नालागोंडा जिल्ह्यातील सीतारामपूरम गावात आश्रय घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस गावात दाखल झाले.
पोलिसांना पाहताच त्यांनी गोळीबार सुरु केला व तेथून निसटून आरवापाली गावात पोहोचले. पोलिस त्यांचा माग काढत त्या गावात पोहोचल्यानंतर ते कोठापल्ली गावात निसटले. तिथे पोलिसांनी सापळा रचला मात्र हा सापळा भेदून इजाउद्दीन आणि अस्लम जानकीपूरममध्ये निसटले.
तिथे पोलिस आणि हल्लेखोरांमध्ये दुस-यांदा गोळीबार झाला. या गोळीबारात एका पोलिस शिपायाचा मृत्यू झाला तर, इजाउद्दीन आणि अस्लम पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले.