आणखी सात भ्रमणध्वनी सापडल्याने खळबळ

0
17

नागपूर,दि,5 -मध्यवर्ती कारागृहात आज रविवारी लाचलुपचपत विभागाचे (एसीबी) महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या उपस्थितीत आणखी सात भ्रमणध्वनी सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याशिवाय, मोबाईलच्या चार बॅटरीज आणि दोन चार्जसही मिळाले आहेत. अतिरिक्त महासंचालकांच्या उपस्थितीत शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अचानक घेतलेल्या शोध मोहिमेदरम्यान मध्यवर्ती कारागृहात २६ भ्रमणध्वनी सापडले होते. तत्पूर्वी पहिल्या दिवशी घेण्यात आलेल्या झडतीत अवघा एक भ्रमणध्वनी सापडला होता. त्यामुळे आता कारागृहातील अधिकारी आणि कैद्यांमध्ये हितसंबंध असल्याची शक्यतेला दुजोरा मिळताना दिसत आहे. या कारागृहातून काही दिवसांपूर्वी पाच कैद्यांनी पलायन केल्यामुळे नागपूरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर प्रशासनाने कडक पावले उचलत एसीबी महासंचालकांना याठिकाणी तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार, नागपूर कारागृहातील ज्या विहीरीमध्ये २६ भ्रमणध्वनी सापडले होते, त्या विहीरीचा आणि कारागृहाचा कोपरा न कोपरा पिंजून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी गरज पडल्यास श्वान पथकांची मदत घेण्यासही सांगण्यात आले होते. या माध्यमातून कारागृहातून पलायन केलेल्या कैद्यांविषयी काही पुरावा मिळवण्याचा पोलीसांचा प्रयत्न आहे