कुंभार समाजाच्या समस्या सोडविणार: खा.अशोक नेते

0
14

गडचिरोली, दि..५: कुंभार समाज गरीब असून, त्यांना व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आपण शासनदरबारी पाठपुरावा करु, अशी ग्वाही गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी दिली.
गडचिरोली येथील संस्कृती सभागृहात कुंभार महासंघातर्फे आयोजित समाजमेळाव्याचे उद्घाटन खा.नेते यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुंभार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, आ.डॉ.देवराव होळी, कुंभार महासंघाचे सरचिटणीस सुभाष तेटवार, विदर्भ कार्याध्यक्ष एकनाथ बुरबांदे, जिल्हाध्यक्ष संजय रामगुंडेवार, दिलीप ठाकरे, ताराबाई कोटांगले, भाजप नेते प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम उपस्थित होते. प्रास्ताविकातून सुभाष तेटवार यांनी कुंभार समाजाला भेडसावणाऱ्या समस्या अतिथींना अवगत करुन दिल्या. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी वर्धा येथे मातीकला बोर्ड स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पूर्ण करावे, तसेच कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करुन कारागिरांना निस्तार हक्काने जळाऊ लाकडांचा पुरवठा व कायमस्वरुपी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर खा. अशोक नेते यांनी कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी तसेच अन्य समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनीही कुंभार समाजाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी कुंभार समाजाच्या वतीने पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, खा.अशोक नेते व आ.डॉ.देवराव होळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन लीलाधर पाठक व किशोर बुरबांधे, तर आभार प्रदर्शन ताराचंद्र कोटांगले यांनी केले.