खासदार ओवेसींनी सलमानला म्हटले ‘बेवडा साहब’

0
16

मुंबई- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीम (एमआयएम)चे नेते व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बॉलिवूड स्टार सलमान खान यांच्यावर निशाना साधताना त्याला ‘बेवडा साहब’ (जास्त दारू पिणारा) म्हटले आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार नारायण राणेंवर टीका करताना त्यांना माकडाची उपमा दिली आहे. नारायण राणे माकडासारख्या उड्या मारून या पक्षातून त्या पक्षातून जात असल्याचे सांगत लक्ष्य केले. महाराष्ट्रात गोमांस बंदी घातली आहे पण त्याऐवजी दारूबंदी केली असती तर मुंबईत गाड्याखाली सापडून लोकांचे मृत्यू तर टाळता आले असते सांगत सलमानला हिट अँड रन प्रकरणावर लक्ष्य केले.
खासदार ओवेसी यांनी रविवारी सायंकाळी मुंबईतील वांद्रे (पूर्व) विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाचे उमेदवारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी ओवेसी यांनी सर्वच प्रस्तापित पक्षांवर व नेत्यांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असणा-या अभिनेता सलमान खानच्या सध्या सुरु असलेल्या हिट अँड रन प्रकरणावरून त्याला जोरदार लक्ष्य केले. सलमान खान हा एक बेजबाबदार व्यक्ती आणि बेवडा साहब असल्याचे सांगत टीका केली. ओवेसी यांनी जानेवारी 2014 मध्येही सलमान खानला लक्ष्य केले होते. त्यावेळी ओवेसी यांनी सलमान खानचा ‘जय हो’ हा सिनेमा न पाहण्याचे आवाहन केले होते.