ताडोबात पट्टेदार वाघाची शिकार; तिघे अटकेत

0
24

चंद्रपूर,दि.7-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात एका पट्टेदार वाघाची जिवंत तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडून शिकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. या प्रकरणी तीन शिकाऱ्यांना मूल येथील बाजारात वाघनखे, दात व मिशा विकतांना चंद्रपूर वन विभागाच्या पथकाने अटक केली असून अन्य आरोपी, कातडी व हाडांचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, वनमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात दोन महिन्यात दोन वाघांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आल्याने वनखाते हादरले आहे.
शिकार करून वाघाचे अवयव बाजारात विकले जात असल्याची माहिती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऑफ इंडिया व मूल येथील वन्यजीव स्वयंसेवी संस्थेचे उमेश गिरे यांना गोपनीय सूत्रांकडून मिळाल्यावर ती वन अधिकाऱ्यांना दिली. वनखात्याने प्रकरणाचा शोध घेतला असता काही लोक मूल येथील बाजारात वाघांचे अवयव विकत असल्याची माहिती मिळाली. याच आधारे सापळा रचून सोमवारी दिलीप मडावी, रामप्रसाद गुरनुले व विनायक मल्लेलवार या तिघांना अटक केली. यात भादुर्णीचे आणखी काही गावकरी सहभागी असून सध्या ते फरार आहेत.