आचारसंहिता भंग केल्याचे सांगत पोलिसांकडून नेत्यांची धरपकड!

0
18

मुंबई दि. ११ – मुंबई/तासगाव- शिवसेनेचे आमदार बाळा सावंत व राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वांद्रे व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आज मतदान होत आहे. मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात आज सकाळच्या सत्रात नागरिक घराबाहेर मतदानाला बाहेर पडल्याचे चित्र होते.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वांद्रे पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच मतदारसंघात मुक्तपणे फिरून आचारसंहितेचा भंग करणारे नारायण राणे यांचे पुत्र निलेश व नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वातावरण तापले आहे. मुलांना ताब्यात घेतल्याचे समजताच त्यांच्या सुटकेसाठी नारायण राणेंनी पोलिस स्थानकात धाव घेतली.तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. त्यानंतर एमआयएमचे खासदार वारिस पठाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व सोडून दिले. वरील सर्वांना आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळेच ते सत्तेचा दुरूपयोग करत असल्याचा आरोप राणेंनी केला. तसेच उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर पोलिसांनी कारवाई का केली नाही ्सा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान वांद्रे येथे दुपारी १२ पर्यंत सरासरी २० टक्के मतदान झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वांद्रे (पू.) मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेनेने तिकीट दिले आहे. त्यांच्यात आणि काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामध्ये खरी चुरस आहे. तृप्ती सावंत व शिवसेनेला आव्हान देत नारायण राणे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
तसेच माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे तासगाव-कवठेमहांकाळची पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस वगळता अन्य कुठल्याही राजकीय पक्षाने उमेदवार दिलेले नाहीत, तरीही आर. आर. पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्यापुढे ८ अपक्षांचे आव्हान आहे. त्यात भाजपाचे बंडखोर उमेदवार स्वप्निल पाटील यांचा समावेश आहे.