खा.शिंदेच्या लेटरहेड गैरवापर प्रकरणी गोंदियाचा युवक ताब्यात

0
10

गोंदिया-कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नामपत्राचा (लेटरहेड) गैरवापर केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला त्यांचा स्वीय सहायक संजीत बॅनर्जी यांच्या चौकशीत अनेक तथ्ये समोर आली आहेत.याप्रकरणात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील एका युवकाचा सुध्दा समावेश आहे.डुग्गीपार पोलीस निरिक्षक केंद्रे यानी याप्रकरणात अजय लांजेवार यांना ठाणे गुन्हे अन्वशेषन शाखेने तपासाठी नेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डॉ. शिंदे यांची बनावट स्वाक्षरी करून बॅनर्जीने या नामपत्राद्वारे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या समितीवर दोन जणांची नेमणूक केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे अनेक खासदारांकडून शिफारसपत्र घेऊन बॅनर्जी याने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या ‘पर्सनल स्टाफ’मध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रेल्वे मंत्रालयात त्यांची डाळ शिजली नाही. बॅनर्जीसह अन्य दोन खासदारांच्या स्वीय साहाय्यकांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी धडक कारवाई करत अरविंद तिवारी, संदीप सिंह (दोघे नवी दिल्ली), महादेव रेड्डी (नवी मुंबई), बाबासाहेब खरात (वाशी), प्रदीप लोटेकर (कांदिवली) व लांजेवार (गोंदिया) व बॅनर्जीसह सात जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून डॉ. शिंदे यांनाच बॅनर्जीवर संशय होता. ‘तुम्ही नामनिर्देशित केलेले सदस्य मंत्रालयाने संबंधित समितीवर नियुक्त केले आहे,’ असे पत्र डॉ. शिंदे यांना अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान प्राप्त झाले होते. नेमके त्याच वेळी डॉ. शिंदे यांनी मंत्रालयास स्वत:च्या स्वाक्षरीचे पत्र पाठवले होते. खा. चिराग पासवान यांनी डॉ. शिंदे यांना तुमच्याकडून दोन पत्रे आल्याची माहिती पुरवली. तेव्हा शिंदे यांचा संशय बळावला. त्यांनी संबधित मंत्रालयाकडून सर्व पत्रे मागवली. त्यापैकी दोन पत्रांवर शिंदे यांची बनावट स्वाक्षरी होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र संपताच डॉ. शिंदे यांनी ठाण्यातील श्रीनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला.